आधी अंडरस्टॅन्डींग, मग जुगलबंदी, काय नेमकं घडलं 'या' दोन नेत्यांमध्ये?

दादा म्हणाले, ते तुमच्यातच राहू द्या. मला यात गुंतवू नका... 

Updated: Mar 22, 2022, 04:49 PM IST
आधी अंडरस्टॅन्डींग, मग जुगलबंदी, काय नेमकं घडलं 'या' दोन नेत्यांमध्ये? title=

मुंबई : अनुदान मागण्यांच्या चर्चेवरून विधानसभेतलं वातावरण कोपरखळ्यांनी चांगलंच गाजलं. नगर जिल्ह्यातील भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील आणि संगमनेरचे काँग्रेस नेते राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचं हाडवैर काही लपून राहिलेलं नाही. 

राधाकृष्ण विखे पाटील हे काँग्रेसमध्ये असतानाही त्यांचे आणि थोरात यांचे सुत कधीच जुळले नाहीत. त्यांच्यातील या सुप्त संघर्षाची जाणीव असलेले   राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सभागृहात थोरात आणि विखे पाटील यांना असा काही चिमटा काढला की, सभागृहातील वातावरण काही काळ बदलून गेले.     

विधानसभेत महसूल विभागाच्या अनुदान मागणीवरील चर्चेला सुरूवात झाली. महसूल मंत्री थोरात यावेळी सभागृहात उपस्थित नव्हते. याला विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी हरकत घेतली. तर, याचवेळी राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाषणाला सुरवात केली.

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी नेमकी ही संधी साधून विखे पाटील यांना शाब्दिक चिमटा काढला. विखे आणि थोरात यांचे जिल्यात अंडरस्टॅन्डींग आहे. त्यामुळे थोरात नसले तरी चालतं, असं जयंत पाटील म्हणाले. यावरुन सभागृहात हास्यकल्लोळ उडाला. 

त्यानंतर काही वेळानं महसूल मंत्री बाळासाहेब थोरात सभागृहात आले. त्यावेळीही विखे पाटील यांचं भाषण सुरु होतं. त्यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाहून दादा, " २० हजार कोटींचा महसूल बुडतोय याकडे लक्ष द्या. आदिवासी जमिनीत गैरव्यवहार झाला. त्यासंदर्भात चौकशी करा अथवा न्यायालयात जावू असा इशारा दिला. 

त्यावर, बाळासाहेब थोरात यांनी 'विखे विरोधी पक्षनेते होते. त्यावेळची धार त्यांना आता गवसली, असा टोला लगावला. त्यावर, विखे पाटील यांनीही, आमची धार अजून तुम्ही पाहिली नाही, अशी कोपरखळी लगावली. 

राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुन्हा अजित पवार यांच्याकडे वळत दादा महसूल बुडतोय, लक्ष द्या असे सांगितले. त्यावर अजित पवार यांनीही, विखे-थोरात हा वाद तुमच्यातच राहू द्या. मला यात गुंतवू नका असे सांगितले. त्यावरही सभागृहात हास्याचा स्फोट झाला.