प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर : थर्टी फर्स्टसाठी तुम्ही बाजारात जाऊन मटण आणत असाल तर सावधान... तुम्ही आणणलेलं मटण ताजं आणि स्वच्छ आहे का याची तपासणी करा... कारण तुम्ही आणलेलं मटण अस्वच्छ आणि शिळं असण्याची शक्यता आहे. कोल्हापुरात एफडीएने मटणाच्या दुकानावर छापा टाकलाय.
मटणाच्या दुकानात उभं राहून आवडीनुसार मटण कापून घेणाऱ्या खवय्यांची संख्या कमी नाही. पण तुम्ही जे मटण आणता ते योग्य आहे का याची खात्री करा. कारण कोल्हापुरात अन्न आणि औषध प्रशासनाने मटणाच्या दुकानावर छापा टाकला आहे. राजू मटण शॉप असं या दुकानाचं नाव आहे. या मटणाच्या दुकानात स्वच्छतेसंदर्भातले निकष पाळले गेले नाहीत असा एफडीएचा दावा आहे. शिवाय मटण ज्या पाण्याने धुतलं ते पाणीही योग्य नव्हतं. तसंच मटण कापणाऱ्या कर्मचाऱ्यांचीही वैद्यकीय चाचणी झाली नव्हती असं एफडीएचं म्हणणं आहे.
कधी कधी मटण देताना आदल्या दिवशी शिल्लक राहिलेल्या बकऱ्याचं मटणही ग्राहकाच्या गळ्यात बांधलं जातं. असं मांस खाल्ल्याने आरोग्य धोक्यात येऊ शकतं. त्यामुळं मटण घेताना काळजी घेण्याचं आवाहान एफडीएनं केलं आहे.
एफडीए जे निकष सांगते ते निकष मटण व्यावसायिक पाळत असतील का नाही याबाबत साशंकता आहे. पण अस्वच्छता असेल अशा दुकानातून मटण घेऊच नका.