Maharashtra Unseasonal Rain : राज्यभरात अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) धुमाकूळ घातला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात पुढचे 3 दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भ, कोकणात अवकाळी पावसाचा फटका बसला. हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात वीज कोसळून दोघांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक ठिकाणी जनावरे देखील दगावली आहेत. तर, शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसासह दोन्ही जिल्ह्यात पाच ठिकाणी वीज कोसळली आहे. यात दोघांचा मृत्यु झाला आहे. तर, दोन जनावरे ही दगावली आहेत. परभणीच्या मानवत तालुक्यातील मांडेवडगाव परिसरात विजांच्या कडकडाटात पाऊस झाला. यावेळी एका 56 वर्षीय इंदुमती नारायण होंडे या महिलेच्या अंगावर वीज पडून त्यांचा मृत्यू झाला. त्या शेतामध्ये कापूस वेचणी करत होत्या, तर दुसरी वीज कोसळण्याची घटना जिंतूर तालुक्यातील कौडगाव येथे घडली, सुभाष घुगे यांच्या शेतात बांधलेल्या म्हशीवर वीज कोसळल्याने म्हशीचा जागीच मृत्यू झाला आहे. हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यातील बोरजा येथील तरुण शेतकरी पिराजी चव्हाण यांचा वीज पडून मृत्यू झाला आहे. ते हळद काढणीसाठी शेतात गेले होते, तर दुसरी घटना औंढा तालुक्यातील गोजेगाव येथे घडली आहे. गोजेगाव येथील शेतकरी विश्वनाथ महादराव ढवळे यांच्या शेतात बैलजोडी वर विज पडली असून त्यांचा एक बैल दगावला आहे. तर, तिसरी घटना हिंगोली शहरातील शासकीय विश्रामगृहातील पाठीमागे लिंबाच्या झाडावर वीज पडली आहे.
बीड जिल्ह्यात तुफान वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्यानं अतोनात नुकसान झालंय. तब्बल एक तास इथं मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे शेतीपिकाचं प्रचंड नुकसान झालय.. वादळी वा-यामुळे मोठ मोठी झाडं उन्मळून पडली आहेत तर काही घरावरील पत्र उडून गेले आहेत. केज तालुक्यातील काही गावांमध्ये वादळी वाऱ्यासह गाराचा पाऊस पडला. यात अंबा ,कांदा ,उन्हाळी सोयाबीन,टरबूज, खरबूजासह भाजीपाला शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. केज तालुक्यातील मांगवडगाव इथं वीज पडून गाईचा मृत्यू झाला तर देवगावात वीज पडून म्हैस दगावली आहे बोरगावच्या शिवारात जोरदार पावसासह गारा पडल्या. त्यामुळे गहु ,ज्वारी, आंब्याचं नुकसान झाल आहे.
पुढचे दोन दिवस संपूर्ण राज्यात पावसाचा इशारा देण्यात आलाय. मराठवाड्यातल्या धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये गारपीटीचा इशारा देण्यात आलाय. तर विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्रात वादळी वा-यासह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिलाय.