नांदेड पालिका निवडणुकीत प्रायोगिक तत्वावर व्हीव्हीपॅटचा वापर

नांदेड - वाघाळा पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ११ ऑक्टोबर २०१७ रोजी होणाऱ्या मतदानासाठी एका प्रभागात प्रायोगिक तत्वावर व्हीव्हीपॅटचा (व्होटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट ट्रेल) वापर करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली. 

Updated: Sep 21, 2017, 11:52 PM IST
नांदेड पालिका निवडणुकीत प्रायोगिक तत्वावर व्हीव्हीपॅटचा वापर title=

मुंबई : नांदेड - वाघाळा पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ११ ऑक्टोबर २०१७ रोजी होणाऱ्या मतदानासाठी एका प्रभागात प्रायोगिक तत्वावर व्हीव्हीपॅटचा (व्होटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट ट्रेल) वापर करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली. 

भारत निवडणूक आयोगाने लोकसभा व विधानसभा निवडणुकांसाठी टप्प्याटप्प्याने व्हीव्हीपॅटचा वापर करण्यास सुरूवात करावी, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने ऑक्टोबर २०१३ मध्ये दिले. त्यानुसार भारत निवडणूक आयोगाने देशात काही ठिकाणी प्रायोगिक तत्वावर या यंत्राचा वापर सुरू केला आहे. 

नांदेड- वाघाळा महानगरपालिकेच्या निवडणुकीत या यंत्राचा वापर करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने ४०० व्हीव्हीपॅट खरेदी तत्वावर उपलब्ध करून देण्याबाबत इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या कंपनीला कळविले होते; मात्र, तांत्रिक अडचणीमुळे खरेदी तत्वावर व्हीव्हीपॅट पुरविण्यास कंपनीने नंतर असमर्थता दर्शविली. मात्र या निवडणुकीत प्रायोगिक तत्वांवर काही व्हीव्हीपॅटच्या वापरास राज्य निवडणूक आयोगाने परवानगी द्यावी, अशी विनंती कंपनीने केली होती. त्यानुसार एका केंद्रावर याचा वापर होणार आहे.

व्हीव्हीपॅटच्या वापरासंदर्भात महानगरपालिका आयुक्तांनी आज मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची व इतर मान्यवरांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीतच सर्वांच्या उपस्थितीत चार सदस्य संख्या असलेल्या १९ प्रभागांतून सोडतीद्वारे प्रभाग क्रमांक २ ची निवड करण्यात आली. या प्रभाग क्र.२ मधील सर्व मतदान केंद्रांवर आता व्हीव्हीपॅटचा प्रायोगिक तत्वावर वापर केला जाणार आहे.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x