वंचित बहुजन आघाडी सगळ्या ४८ जागा लढणार-प्रकाश आंबेडकर

काँग्रेससोबत आघाडी करण्यासाठी दिलेला अल्टीमेटम संपल्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभेच्या सगळ्या ४८ जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. 

Updated: Feb 3, 2019, 10:16 PM IST
वंचित बहुजन आघाडी सगळ्या ४८ जागा लढणार-प्रकाश आंबेडकर title=

पंढरपूर : काँग्रेससोबत आघाडी करण्यासाठी दिलेला अल्टीमेटम संपल्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभेच्या सगळ्या ४८ जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. वंचित बहुजन आघाडीचा सत्ता संपादन मेळावा माळशिरस तालुक्यातील माळीनगरमध्ये आयोजित करण्यात आला होता. यावेळी भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडी राज्यातल्या सगळ्या जागा लढणार असल्याचं सांगितलं.

काँग्रेससोबत आघाडी करण्याची इच्छा होती, त्यासाठी चर्चाही झाली, पण आमचा लढा गैरसंविधानवादी आणि संविधान न मानणाऱ्या आरएसएसशी आहे. आरएसएसला संविधानाच्या चौकटीत आणण्यासाठी काँग्रेसचा आराखडा त्यांनी द्यावा, अशी मागणी केली होती, पण काँग्रेस नेते बोलत नाहीत, असं वक्तव्य आंबेडकर यांनी केलं.

काँग्रसेनं पहिल्यांदा एमआयएमचा बागुलबुवा उभा केला, पण ओवेसींनी सांगितल्यानंतर तो विषयही संपला, तरी काँग्रेसकडून कोणताही प्रस्ताव आला नसल्याची खंत प्रकाश आंबेडकर यांनी बोलून दाखवली. आघाडी करण्यासाठी दिलेली ३० जानेवारीची मुदत संपली असल्यानं आमचा नाईलाज झाल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणाले. तसंच आता जिथे सभा होईल तिथे आमचा उमेदवार घोषित केला जाईल, अशी घोषणा प्रकाश आंबेडकर यांनी केली.

छगन भुजबळ हे हिंदुत्ववादी सरकारचे बळी आहेत. जर भुजबळ लोकसभा निवडणूक लढवतील तर त्यांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार नसेल, असं आंबेडकर यांनी स्पष्ट केलं. तसंच अजित पवार आणि सुनिल तटकरे यांच्यावरही कारवाई झाली, तर जी भूमिका छगन भुजबळ यांच्याबद्दल आहे तीच या दोघांबद्दलही असेल, अशी माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिला.