चोरी करायला गेला पण मोबाईल विसरुन आला, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पैसे चोरून पसार झालेल्या चोरट्याला माणिकपूर पोलिसांनी अवघ्या चार तासात जेरबंद केले. 

Updated: Dec 5, 2019, 09:38 PM IST
चोरी करायला गेला पण मोबाईल विसरुन आला, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

वसई : चोरी करण्याच्या भल्या भल्या शक्कल सराईत चोर वापरतात आणि आपली चोरी सिद्धीस नेतात. पोलिसांना आपला थांगपत्ताच लागणार नाही या आत्मविश्वात ते असतात. पण चोर काही ना काही पुरावा मागे ठेवतोच हे पोलिसांना माहित असतं. वसईत झालेल्या चोराने तर चक्क स्वत:चा मोबाईलच चोरी केलेल्या ठिकाणी ठेवला..म्हणजे तो विसरला..मग काय अवघ्या चार तासात पोलिसांनी कारवाई फत्ते केली. वसईतील एका मोबाईल दुकानाच्या गल्ल्यातील पैसे चोरून पसार झालेल्या चोरट्याला माणिकपूर पोलिसांनी अवघ्या चार तासात जेरबंद केले. 

चोरट्याने गल्ल्यातील पैसे चोरले मात्र दुकानमालकासोबत झालेल्या झटापटीत तो त्याचा फोन तेथेच विसरून पळाला होता. चोरट्याने गल्ल्यातील 28 हजाराची रोख रक्कम लांबवली होती. ही घटना सिसिटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. 

माणिकपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत भवानी मोबाईल आणि टॅव्हल्स या दुकानात काल रात्री आठ वाजता एक चोरटा ग्राहक बनून आला.सामान घेण्याच्या बहाण्याने त्याने मालकाला गुंतवून गल्लातील पैसे काढले.पैसे काढल्याचे लक्षात येताच मालकाची चोरट्यासोबत झटापटही झाली. 

यादरम्यान चोरट्याने दुकानमालकाच्या हाताला झटका देऊन दुकानाबाहेर पळ काढून पोबारा केला. मात्र या गडबडीत त्याचा मोबाईल दुकानात राहिला होता. दुकानमालकाला लक्षात आल्यावर पोलिसात त्यानी तक्रार दाखल केली.

आकाशचंद चौबे असे या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून 18 हजार रूपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. तसेच उर्वरीत 10 हजार रूपये त्याने खर्च केले असल्याचे त्याने सांगितले.