Vasant More On Fighting Loksabha Election 2024: लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याआधीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा धक्का देत पुण्यातील फायर ब्रॅण्ड नेते वसंत मोरेंनी पक्षाला सोड चिठ्ठी दिली. त्यानंतर वसंत मोरेंनी राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवारांबरोबर उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचीही भेट घेतली. वसंत मोरेंनी त्यांना सर्वच राजकीय पक्ष संपर्क करत असल्याचा दावा मनसे सोडल्यानंतर दुसऱ्या दिवशी केला. मात्र एकीकडे महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागा वाटपावरुन रस्सीखेच सुरु असतानाच दुसरीकडे वसंत मोरेंनी अद्याप आपली पुढील राजकीय भूमिका स्पष्ट केलेली नाही. मात्र वसंत मोरे पुढे काय करणार आहेत याबद्दल त्यांनी मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना अगदी स्पष्ट शब्दांमध्ये सांगितलं. भारतीय जनता पार्टीचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील यांनी वसंत मोरेंसंदर्भात केलेल्या विधानावरही मोरेंनी थेट प्रतिक्रिया नोंदवली आहे.
लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर थेट पहिल्यांदाच प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना वसंत मोरेंनी निवडणुकीला कमी दिवस असल्याचं पटत नाही असं म्हटलं. "अगदी आजपासून विचार केला तरी निवडणुकीला 55 दिवस आहेत. त्यामुळे कमी दिवस वगैरे शिल्लक आहेत असं काही नाही," अशी प्रतिक्रिया वसंत मोरेंनी नोंदवली. तसेच पुढे बोलताना आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरु तेव्हा खऱ्या अर्थाने निवडणुकीला रंगत येईल असंही वसंत मोरे म्हणाले. "ज्या दिवशी वसंत मोरे रिंगणात उतरेल, त्या दिवशी पुणे लोकसभेच्या निवडणुकीत खऱ्या अर्थाने रंगत येईल. तेव्हा आपण निवडणूक कशी एकतर्फी होईल हे पाहू," असं सूचक विधान वसंत मोरेंनी केलं. तसेच, "मी वेळ घेतोय. योग्य वेळी मी योग्य निर्णय घेईन. माझी वेळ नक्कीच चुकलेली नाही, असे म्हणत आपल्या निर्णयावर आपल्याला विश्वास असल्याचं वसंत मोरेंनी पुन्हा एकदा अधोरेखित केलं.
यावेळेस वसंत मोरेंनी स्पष्टपणे आपली भविष्यातील राजकीय भूमिका काय असेल याबद्दल भाष्य करताना महाविकास आघाडीकडून निवडणुकीचं तिकीट मिळवण्याचा प्रयत्न असल्याचं नमूद केलं. "महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळवण्यासाठी मी प्रयत्न करत आहे. इथे फक्त निवडणुका लढायच्या नसून जिंकायच्याही आहेत. म्हणूनच जिंकण्यासाठी मला लढायचे असेल तर आधी योग्य ट्रॅकवर असणे गरजेचे आहे. मी सध्या अगदी योग्य ट्रॅकवरच आहे. मी जे काही हाती घेतलं आहे त्यात नक्कीच यशस्वी होईन असे मला वाटते," असा विश्वास वसंत मोरेंनी बोलून दाखवला. तसेच पुढे बोलताना वसंत मोरेंनी,"माझ्या पुढील राजकीय वाटचालीसंदर्भात सध्या आम्ही जनमत जाणून घेत आहोत. लोक बरेच वेगवेगळे पर्याय सुचवत आहेत. मात्र ते निवडताना पुण्याच्या हिताचं काम झालं पाहिजे अशा दृष्टीकोनातूनच निर्णय घेण्याचा माझा विचार असतो, असंही वसंत मोरेंनी स्पष्ट केलं.
नक्की वाचा >> 'स्वतःची चड्डी सोडून काँग्रेसचे लंगोट...'; मोदी-शाहांचा उल्लेख करत ठाकरेंचा हल्लाबोल
भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष व विद्यमान आमदार असलेल्या चंद्रकांत पाटलांनी वसंत मोरेंच्या उमेदवारीसंदर्भात काही दिवसांपूर्वी प्रतिक्रिया नोंदवली होती. या प्रतिक्रियेवरही वसंत मोरेंनी मत व्यक्त केलं आहे. 'वसंत मोरे अपक्ष म्हणून निवडणुकीला उभे राहिल्यास आम्हाला फारसा फरक पडणार नाही,' असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते. यावरच प्रतिक्रिया नोंदवताना वसंत मोरेंनी, "त्यांना (भाजपाला) तसा फरक पडला नसता तर 2022 मध्ये त्यांनी मला भाजपामध्ये या असं म्हटलं नसतं. मॅरिएट हॉटेलमध्ये मला पुरस्कार देण्यात आलेला तेव्हाच चंद्रकांत पाटील उघडपणे म्हणालेली की, तुम्ही भाजपामध्ये या. तुम्ही निवडून याल," अशी आठवण सांगितली. तसेच पुढे बोलताना वसंत मोरेंनी, "त्यावेळेस मी त्यांना माझ्या तिन्ही टर्म भाजपाविरोधात झालेल्या आणि मी तिन्ही वेळेस यशस्वी झालेलो," असं उत्तर दिलेल्याचंही सांगितलं. ही जुनी आठवण सांगत, "त्यामुळेच माझ्या उमेदवारीने काय फरक पडेल हे पुणेकर त्यांना दाखवतील," असं म्हणत वसंत मोरेंनी एकाप्रकारे भाजपाला आव्हानच दिलं आहे.