सूनेवरून चित्रा वाघ आणि विद्या चव्हाण यांच्यात जुंपली, ऑडिओ क्लीपवरून राडा, कोण काय म्हणाले?

एकीकडे मसने विरुद्ध अमोल मिटकरी असा वाद रंगला असतानाच दुसरीकडे आता महिला नेत्यांमध्ये जुंपल्याचं दिसत आहे.  शरद पवार गटाच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी चित्रा वाघ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. 

सोनेश्वर पाटील | Updated: Jul 30, 2024, 05:02 PM IST
सूनेवरून चित्रा वाघ आणि विद्या चव्हाण यांच्यात जुंपली, ऑडिओ क्लीपवरून राडा, कोण काय म्हणाले?   title=

Vidya Chavan : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी आज पत्रकार परिषद घेत चित्रा वाघ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. काही दिवसांआधी चित्रा वाघ यांनी सोशल मीडियावर शरद पवार यांच्यासह पक्षातील काही नेते व सामाजिक कार्यकर्त्यांचे व्यंगचित्र सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यावरून विद्या चव्हाण यांनी चित्रा वाघ यांच्यावर गंभीर आरोप करत निशाणा साधला आहे.

विद्या चव्हाण यांनी त्यांची सून गौरी चव्हाण आणि चित्रा वाघ यांच्यामधील संवादाची एक ऑडियो क्लिप पत्रकार परिषदेत लावली. यावेळी त्यांनी चित्रा वाघ या माझ्या सुनेला माझ्याविरोधात भडकवत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. माझ्या सुनेला सर्व मदत करणार असल्याचं देखील त्या म्हणाल्या. 

विद्या चव्हाणाचे आरोप काय? 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून हे सर्व घडत असल्याचा दावा विद्या चव्हाण यांनी केला. त्या म्हणाल्या की, चित्रा वाघ सूनेचं बोलणं फडणवीस यांच्यासोबत करुन देतात. त्यानंतर फडणवीस म्हणातात की, या प्रकरणाची जबाबदारी चित्रा वाघ यांना दिली आहे. चित्रा वाघ तुम्हाला मदत करतील असं विद्या चव्हाण यांनी म्हटलं आहे. 

6 महिन्यांपूर्वी मला ही ऑडिओ क्लिप मिळाली. माझ्या कुटुंबाचा राजकारणाशी संबंध नसताना देखील त्यांचा राजकारणासाठी वापर केला जात आहे. असा आरोप विद्या चव्हाण यांनी केला आहे. आता विद्या चव्हाण यांनी केलेल्या आरोपांवर चित्रा वाघ काय प्रत्युत्तर देतात हे बघावे लागणार आहे. 

चित्रा वाघ यांची शरद पवारांवर टीका

काही दिवसांआधी चित्रा वाघ यांनी सोशल मीडियावर शरद पवार यांच्यासह पक्षातील काही नेते व सामाजिक कार्यकर्त्यांचे व्यंगचित्र सोशल मीडियावर शेअर केले होते. 'एक छान कार्टून पाहण्यात आले. ज्याने काढले, त्याच्या कल्पकतेला सलाम! महाराष्ट्राचे पक्षीमित्र ! एकाचा वापर संपला की दुसरा पिंजऱ्यातून बाहेर काढतात' असं कॅप्शन त्यांनी पोस्ट शेअर करताना लिहिले होते.