वर्धा : वर्ध्याचे जिल्हाधिकारी (Wardha Collector) म्हणून राहुल कर्डिले (Rahul Kardile) यांनी मावळत्या जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांच्याकडून आज पदभार स्विकारला आहे. नवे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले हे 2015 च्या तुकडीचे भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी आहे. वर्धा येथे रुजू होण्यापूर्वी राहुल कर्डिले एमएमआरडीए मुंबई येथे सह आयुक्त या पदावर कार्यरत होते. त्यापूर्वी चंद्रपूर येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अमरावती जिल्ह्यातील धारणी येथे उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत होते. पदभार स्विकारताच विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेतली.
प्रेरणा देशभ्रतार यांची बदली झाल्याने नाराजगी?
जिल्ह्यात 1 वर्षाचा कालावधीत तत्कालीन जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी गोर,गरीब आणि शेतकऱ्यांच्या कामाला आधी प्राधान्य दिले होते. महिला जिल्हाधिकारी असल्याने जिल्ह्यात महिलांचे बचत गट देखील मजबूत करण्यासाठी त्यांनी विशेष काम केले. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या दबावाला बळी न पडता त्यांनी काम केले. नियमानुसार त्यांनी कामाला प्राधान्य दिलं. त्यामुळे जिह्यात त्यांची लोकप्रियता चांगलीच वाढली होती.
कठोर कार्यशैली आणि कर्तव्य दक्ष अधिकारी म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली होती. सरकारी काम आणि बारा महिने थांब अशी म्हण त्यांनी पदभार स्विकारताच बंद केली होती. त्यामुळे अधिकाऱ्यांवर त्यांचा 24 तास वचक होता.
महिन्याभरा अगोदर हिंगणघाट तालुक्यात आलेल्या पुरात स्वतः आढावा घेण्यासाठी देशभ्रतार पूरग्रस्त भागात गेल्या होत्या. त्यांनी नियोजन करुन 480 नागरिकांना पुराच्या विळख्यातून सुखरूप बाहेर काढले. मात्र अचानक जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांची बदली झाल्याने जिल्ह्यात नाराजगीचा सूर दिसून येत आहे.
कोरोना काळात जनतेसाठी काम
जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्याची परिस्थिती मोठी भयावह झाली होती. एकीकडे जिल्ह्यात रुग्ण वाढत असतांना कोरोनाचा मृत्यू दर ही मोठ्या प्रमाणात वाढ होता. दिवस रात्र मेहनत घेऊन कोरोनाचा मृत्यू दर कमी केला. रुग्णांची कोणतेही गैरसोय होणार नाही याची काळजी घेत स्वतः कोरोना काळात 18-18 तास काम करून अनेक रुग्णांचे प्राण वाचविण्यात यश आले होते. त्यांच्या या कामाने विधानसभेत देखील त्यांच्या कामाचे कौतुक झाल्याचे अनेकदा तत्कालीन पालकमंत्री सुनील केदार यांनी अनेकदा भाषणातून देखील सांगितले होते.