गणेश मोहळे, झी मीडिया, वाशिम: वडील गेल्यानंतर त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी घरातील मुलगा देतो अशी आपल्याकडे परंपरा आहे. मात्र हाच पायंडा मोडत मुलींनी आपल्या पित्याचे अंत्यसंस्कार केले आहेत. पुरुषप्रधान संस्कृतीला मागे टाकत आपल्या लाडक्या पित्याला 12 मुलींनी खांदा देवून भरलेल्या डोळ्यांनी अखेरचा निरोप दिला.
ग्रामीण भागात शिक्षणाची पाळेमुळे रुजविणारे दानशूर सखाराम गणपतराव काळे यांचे वृध्दापकाळाने वयाच्या 92व्या वर्षी निधन झाले. अंत्यसंस्काराला मुलगा नसल्याची कोणतीही उणीव यावेळी त्यांच्या मुलींनी जाणवू दिली नाही. 12 मुलींनी सगळे विधी अगदी योग्य पद्धतीनं आणि परंपरेनुसार पार पाडले. इतकंच नाही तर 12 मुलींनी वडिलांना खांदा देत अंत्ययात्रा काढली.
मुलगा नाही त्यामुळे वडिलांचा अंत्यविधी अडला नाही तर मुलींनी पार्थिवाला खांदा देऊन स्मशानभूमीत घेऊन गेल्या. त्यांनतर अग्निही मुलींनीच दिला त्यामुळं परिसरात हा विषय कुतूहलाचा ठरला .
पुरुषप्रधान संस्कृतीचा पायंडा मोडत 12 मुलींनी पित्याला दिला खांदा...
प्रतिनिधी- गणेश मोहळे
झी 24 तास, वाशिम pic.twitter.com/9x9sZeZDhS— Kranti Kanetkar (@Krantikanetkar2) January 31, 2021
आम्ही बारा बहिणी असून, भाऊ नाही त्यामुळं वडिलांची इच्छा होती की मुलींनीच अंत्यविधी करावा ते आम्ही आज पार्थिवाला खांदा देऊन सर्वच विधी पार पाडला आणि वडिलांची ही इच्छा पूर्ण केली असल्याचे त्यांची मुलगी भाग्यश्री काळे यांनी माहिती दिली आहे.
खाराम काळे गेल्या काही दिवसांपासून वृध्दापकाळाने आजारी होते. त्यांच्या निधनानंतर 12 मुलींनी अंत्यसंस्कारासाठी पुढाकार घेतला. पित्याला खांदा देवून सर्व अंत्यसंस्कारही पार पाडले. पुरुष प्रधान संस्कृतीला फाटा देत या बारा लाडक्या मुलींनी आपल्या वडिलांना अखेरचा निराेप दिला. हा प्रसंग पाहून उपस्थितांच्या डाेळ्याचा कडाही पाणावल्याच दिसून आलंय...