VidhanSabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यात विधानसभा निवडणुकीचं वारं वाहू लागलं आहे. महाराष्ट्रातील विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबर रोजी संपणार असल्याने लवकरच राज्यात निवडणूक जाहीर होईल. अशातच आता मतदार कोणाच्या बाजूने कौल देणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. अशातच आता झी 24 तासच्या पहिल्या AI सर्व्हेतून राज्याच कोणाची सत्ता येणार? यावर चित्र स्पष्ट होताना दिसत आहे. झी 24 तासनं विधानसभेचा सर्वात मोठा AI सर्व्हे केला आहे. पहिली मराठी AI अँकर ZEENIA हा सर्व्हे जाहीर करणार आहे. अशातच राज्यातील जनतेला फोडाफोडीच्या राजकारणाबद्दल काय वाटतं? याचा कौल समोर आलाय.
राज्यात झालेलं फोडाफोडीचं राजकारण महाराष्ट्रातील 30 टक्के लोकांना योग्य वाटतंय. तर 50 टक्के लोकांना म्हणजेच अर्ध्या महाराष्ट्राला फोडाफोडीचं राजकारण पटलेलं नाहीये. तर 20 टक्के नागरिकांना यावर काहीही वाटत नाहीये. 20 टक्के लोकांनी सांगता येत नाही, असा पर्याय निवडला आहे.
तसेच राज्यात जातीच्या आधारावर मतदान होईल का? असा सवाल सर्व्हेमध्ये विचारला गेला होता. त्यावर लोकांनी आश्चर्यजनक कौल दिलाय. 65 टक्के लोकांना वाटतंय की आगामी निवडणुकीत जनता जातीच्या आधारावर कौल देईल. तर 30 टक्के लोकांना असं वाटत नाही. तर 10 टक्के लोकांना यावर मत ठरवता आलं नाही.
राज्यातील 288 मतदार संघात हे सर्व्हेक्षण करण्यात आलं असून या सर्वेक्षणात महाराष्ट्राचा कौल नेमका कुणाच्या बाजूने झुकला आहे. यांचा अंदाज घेण्यात आला आहे. या सर्व्हेत आर्टिफीशिअल इंटेलिजेन्सचा वापर करण्यात आला आहे.
दरम्यान, मागील विधानसभा निवडणुकीनंतर राज्याच्या राजकारणात मोठे बदल झाले. उद्धव ठाकरे यांनी भाजपशी फारकत घेतली आणि महाविकास आघाडी निर्माण झाली. तब्बल दोन महिन्यांचा राजकीय ड्रामा रंगला होता. महाविकास आघाडीचं सरकार आलं अन् उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर शिवसेना फुटली आणि युतीचं सरकार राज्यात आलं. आरोप प्रत्यारोपाच्या फेऱ्या झाडल्या गेल्या आणि राज्यात अजित पवार गटाची एन्ट्री झाली. राष्ट्रवादी फुटली अन् महायुतीचं सरकार स्थापन झालं. राजकीय वर्तुळात रंगलेला हा खेळ अनेकांना आवडला नसल्याचं चित्र समोर आलं आहे.
(डिस्क्लेमर- वरील माहिती ही 'झी 24 तास'ने महाराष्ट्राच्या 288 मतदार संघात जाऊन केलेलं सर्व्हेक्षण आहे. हा कोणत्याही प्रकारचा निकाल नसून जनमताचा कौल आहे.)