मम्प्स काय आहे? मुंबई-पुण्यातील बालकांना या गंभीर आजाराचा धोका! लक्षणे-उपचार जाणून घ्या

Mumps Dieses :  गालगुंड हा एक संसर्गजन्य रोग आहे आणि तो गालगुंडाच्या विषाणूमुळे होतो. 

Updated: Dec 16, 2023, 12:27 PM IST
मम्प्स काय आहे? मुंबई-पुण्यातील बालकांना या गंभीर आजाराचा धोका! लक्षणे-उपचार जाणून घ्या  title=

Mumps Dieses : गेल्या काही दिवसांत मुंबई, पुण्यासारख्या महत्वाच्या शहरांमध्ये मम्प्स आजाराचे रुग्ण वेगाने वाढत आहेत. हा एक संक्रमित आजार असून मम्प्स व्हायरसमुळे पसरतो. याला गालगुंड असेही म्हणतात. यामध्ये मुलांना त्वचेची समस्या उद्भवते. मुंबईत याचे रुग्ण आढळले आहेत. तसेच पुण्याच्या भोर तालुक्यातील हिर्डोशी खोऱ्यात गालगुंडाची साथ पसरली आहे. गालगुंड हा एक संसर्गजन्य रोग आहे आणि तो गालगुंडाच्या विषाणूमुळे होतो. हा पॅरामिक्सोव्हायरस नावाच्या विषाणूंच्या गटाशी संबंधित आहे. हा आजार झालेल्या व्यक्तीस डोकेदुखी, ताप आणि थकवा यासारखी सौम्य लक्षणे दिसू लागतात.  सामान्यतः काही लाळ ग्रंथींमध्ये (पॅरोटायटिस) तीव्र जळजळ होते. ज्यामुळे गाल आणि जबडा सुजतो.

काही वर्षांपूर्वी हा एक गंभीर आजार होता. पण 1967 मध्ये लस उपलब्ध झाल्यानंतर, रुग्णांची संख्या लक्षणीयरीत्या कमी झाली. पण कधी कधी त्याचा उद्रेक अजूनही होत असतो. त्यामुळे खबरदारी घेत राहणे गरजेचे आहे. 

गालगुंड झालेल्या व्यक्तीस सर्दी होणे, ताप येणे, लाळ येणे, घशात सूज येणे, ऐकण्यात अडचण येणे, अशी लक्षणे आढळतात. हा संसर्गजन्य आजार असून एका मुलातून दुसऱ्या मुलांमध्येही पसरू शकतो. त्यामुळे या आजाराने ग्रस्त असलेल्या मुलाला इतर मुलांपासून दूर ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.

कोणाला धोका ?

कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेले, आंतरराष्ट्रीय प्रवास करणारे, विषाणूविरूद्ध लसीकरण न केलेले आणि कॉलेज कॅम्पस सारख्या जवळच्या भागात राहणाऱ्यांना गालगुंडाचा त्रास होण्याचा धोका जास्त असतो. 

गालगुंडांवर उपचार काय?

हा आजार लक्षात येताच बाधित बालकावर तातडीने उपचार करणे आवश्यक आहे. अशा वेळी रुग्णावर अ‍ॅण्टीबायोटीक देऊन उपचार केले जातात. एवढेच नव्हे तर या आजारावर वेळीच उपचार न केल्यास बालकाची ऐकण्याची क्षमता कमी होऊ शकते. त्यामुळे मुलांनी वेळेवर लसीकरण करणे आवश्यक आहे.

पुण्यात गालफुगी‌ची साथ 

पुण्याच्या भोर तालुक्यातील हिर्डोशी खोऱ्यात गालफुगी‌ची साथ पसरलीय, परिसरामध्ये गालफुगी आजाराचे रुग्ण वाढलेत. गेल्या आठ दिवसांपासून परिसरातील गावांमध्ये  गालफुगीचे रुग्ण आढळतायत, यात 5 ते 12 वर्षे वयोगटातील लहान मुलांची संख्या अधिकयं. आजाराने लहानमुले हैराण झालीयत. गालफुगीमुळे, सर्दी ताप येणे,पोटाचे विकार, उलट्या अशा त्रासांनी रुग्ण त्रस्तयत. आजाराची लक्षणे दिसून येतील त्यांनी तात्काळ डॉक्टरांना दाखवून उपचार करून घ्यावेत, असं आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आलंय.