Thanjavur Marathi Language Interesting Facts: महाराष्ट्राची राज्यभाषा मराठी आहे. राज्यात वेगवेगळ्या जिल्ह्यात मराठी भाषा बदलत जाते. भाषेत एक वेगळ्या प्रकारचा लहेजा येतो. त्यामुळं मराठी भाषा एक असली तरी ती वेगवेगळ्या पद्धतीने बोलली जाते. मराठ्यांनी दिल्लीवरही स्वराज्याचा झेंडा फडकावला होता. देशातील अनेक राज्यात मराठा शासक होते. इंदूरमध्ये अहिल्याबाई होळकर, बडोद्याचे गायकवाड घराणे, मध्य प्रदेशातील शिंदे घराणे. येथे आजही मराठी संस्कृती जपली जाते. या घरण्यांबरोबरच तामिळनाडूतील तंजावर घराण्याचेही नाव घेतले जाते. आजही तंजावरमध्ये मराठी संस्कृती जोपासली जाते. इतकंच काय तर तिथे तंजावर मराठी बोलली देखील जाते. तंजावर मराठी म्हणजे काय आज हे जाणून घेऊया.
तंजावरमध्ये आजही मराठ्यांच्या राजवटीच्या व इतिहासाच्या खुणा दिसतात. तंजावर हे तामिळनाडू राज्यातील एक जिल्हा आहे. कावेरी नदीच्या दक्षिण तीरावर हे वसलेले आहे. सुरुवातीला या प्रदेशावर चोल घराण्याने राज्य केले. त्यानंतर नायक आणि भोसले घराण्याच्या अधिकाराखाली हा प्रदेश आला. भोसले घराणाच्या राजधानीचे हे ठिकाण होते.
छत्रपती शिवाजी महाराजांचे सावत्र बंधू व्यंकोजीराजे भोसले यांनी तंजावरचा प्रदेश जिंकला. व्यंकोजीराजे हे तंजावरचे पहिले राजे होते. राजे मराठीभाषक होते. त्यामुळं येथील मराठी भाषा महाराष्ट्रापेक्षा थोडी वेगळी असते. त्याच भाषेला तंजावर मराठी असं म्हणतात. मराठी भाषेला दक्षिणी भाषेची जोड मिळाल्याने येथील भाषेला दक्षिणी मराठी असंही म्हटलं जातं.
व्यंकोजीराजेंनी तंजावर प्रांत जिंकून घेतल्यानंतर महाराष्ट्रातील जनतेला तंजावर येथे येण्याचे अवाहन केले. त्यानुसार जवळपास पाच लाख मराठ्यांनी तंजावरमध्ये स्थलांतर केले. त्याचवेळी मराठी भाषिकाच्या एकूणच जीवनपद्धतीवर तमिळ भाषेचा व संस्कृतीचा प्रभाव वाढायला लागला. त्यामुळं काही वर्षांतच मराठी आणि तमिळ मिश्रित अशी तंजावर मराठी अशी नवीन बोलीभाषा उदयास आली. आजही तामिळनाडू येथे अशी अनेक मराठी कुटुंब आहेत जे तंजावर मराठी बोलतात. आजही महाराष्ट्रापासून हजारो किलोमीटर दूर असलेल्या दक्षिणेकडील राज्यात तंजावर मराठी जोपसली जात आहेत.
तंजावरमध्ये आजही भोसले घराण्याचे वंशज राहतात. पॅलेस कॉम्प्लेक्स या राजवाड्यात भोसले घराण्याचे वंशज राहतात. येथील राजवाड्यात मराठी सत्तेच्या वैभवशाली इतिहासाच्या खाणाखुणा दिसतात. तंजावरचे मराठी कुटुंब आजही मराठी सण व परंपरा जपल्या आहेत. आजही गुढीपाडवा, संक्रात, गणेशोत्सव असे सण साजरे केले जातात. तंजावरमध्ये ७४ मंदिरे असून त्यांपैकी बृहदीश्वराचे मंदिर प्रेक्षणीय आहे. प्रसिद्ध नटराजाची मूर्ती याच मंदिरात आहे. या मंदिरावर एक शिलालेख नंतर खोदलेला असून तो ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचा आहे.