काय होता शिवसेनेचा प्लॅन; सोमय्यानी दिली ही माहिती

पुणे हल्ला प्रकारणाचा अहवाल केंद्रीय गृहमंत्रालयाला गुरुवारी देणार आहे. ठाकरे सरकारचे घोटाळे काढूनच गप्प बसणार असा इशारा किरीट सोमय्या यांनी दिला आहे.   

Updated: Feb 7, 2022, 02:04 PM IST
काय होता शिवसेनेचा प्लॅन; सोमय्यानी दिली ही माहिती title=

मुंबई : पुण्यात शिवसेनेच्या गुंडांनी माझ्यावर प्राणघातक हल्ला केला. यासाठी मी उद्धव ठाकरे, संजय राऊत यांना सोडणार नाही. शिवसेनेच्या गुंडांवर कठोर कलमातंर्गत कारवाई करायला लावेन. याचा रिपोर्ट केंद्रीय गृहमंत्रालयाला गुरुवारी देणार आहे. ठाकरे सरकारचे घोटाळे काढूनच गप्प बसणार, असा इशारा भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांनी दिला आहे. 

किरीट सोमय्या यांच्यावर पुणे महानगरपालिकेत शिवसैनिकांनी हल्ला केला होता. या झटापटीत खाली पडून त्यांना दुखापत झाली होती. या पार्श्वभूमीवर सोमय्या यांनी सोमवारी पत्रकारांशी संवाद साधला. मनसुख हिरेन यांची ज्याप्रकारे हत्या करण्यात आली. त्याचप्रकारे माझीही हत्या करण्याचा उद्धव ठाकरे सरकारचा प्लँन होता, असा आरोप त्यांनी यावेळी केला. 

 

पुणे येथील घटनेच्या एक एक व्हिडीओ क्लिप बाहेर येत आहेत. दगड, लाठी, काठी घेऊन माझ्या गाडीमागे शिवसैनिक धावत होते. हा हल्ला होत असताना पुणे पोलीस शांत होते. त्या शिवसैनिकांना “किरीट सोमय्यांचे हात पाय तोडा; दोन-चार महिने उठले नाही पाहिजेत असा आदेश होता” असा गौप्यस्फोट सोमय्या यांनी केला. 

संजय राऊत, उद्धव ठाकरे, अनिल परब, पाटणकर यांचे घोटाळे बाहेर येत आहेत म्हणून त्यांना किरीट सोमय्या यांना गप्प बसवायचे आहे. पण त्यांचे घोटाळे बाहेर काढूनच मी गप्प बसणार असा इशाराही त्यांनी दिला.