सुट्टी असतानाही त्याने कर्तव्य निभावलं, पेटत्या घराला असं वाचवलं

शहरात घडणाऱ्या आगीच्या घटनांमध्ये अग्निशमन दलाचे अधिकारी आणि जवान कर्तव्य बजावत पार पाडतात. या जवानांनी सतर्कता, समयसूचकता दाखवत अनेक घटनांमध्ये अनेक लोकांचे प्राण वाचविले आहेत.

Updated: Apr 27, 2022, 06:29 PM IST
सुट्टी असतानाही त्याने कर्तव्य निभावलं, पेटत्या घराला असं वाचवलं title=

पुणे : शहरात घडणाऱ्या आगीच्या घटनांमध्ये अग्निशमन दलाचे अधिकारी आणि जवान कर्तव्य बजावत पार पाडतात. या जवानांनी सतर्कता, समयसूचकता दाखवत अनेक घटनांमध्ये अनेक लोकांचे प्राण वाचविले आहेत. अशीच सतर्कता, समयसूचकता वडाची वाडी येथे राहणारे फायरमन राहुल बांदल यांनी सुट्टी असतानाही दाखवली.

पिसोळी येथील हॉटेल आंबेकर जवळील एका घरामधील सिलेंडरने पेट घेतला. आगीने पेट घेतला आणि घरआगीच्या भक्ष्यस्थानी सापडले. शेजारी राहणारे रोहित सोनी यांनी आपले मित्र जवान राहुल बांदल यांना फोन करुन ही माहिती दिली.

जवान बांदल सुट्टी असल्याने घरीच होते. त्यामुळे घटनेची माहिती मिळताच त्यांनी अवघ्या काही मिनिटातच घटनास्थळ गाठले. त्यांनी अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाला घडलेल्या घटनेची माहिती दिली.

घटनास्थळी कोणी अडकले आहे का याची जवान बांदल यांनी आधी खात्री करून घेतली. गाड्यांची वाट न पाहत त्यांनी घरातील दोन सिलेंडरवर एका नळीच्या साह्याने पाणी मारत सिलेंडर बाहेर काढत सर्वात मोठा धोका दूर केला.

स्थानिकांच्या मदतीने त्यांनी पाण्याचा वापर करून आग आटोक्यात आणली. या आगीत काही प्रमाणात घरगुती साहित्याचे नुकसान झाले. परंतु, वेळीच आग विझवण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला. जवान बांदल यांनी सुट्टीवर असतानाही बजावलेल्या या कर्तव्यामुळे तेथील नागरिकांनी त्यांचे कौतुक करत अग्निशमन दलाचेही आभार मानले.