वाल्मिक जोशी, जळगाव : शहरातील पिंप्राळा परिसरातील एक कुटूंब गाढ झोपेत असताना भल्या पहाटे नागाने घरात प्रवेश केला. घरात झोपलेल्या सदस्यांना याची कल्पना नव्हती. परंतु घरातील पाळीव मांजरीच्या हा प्रकार लक्षात आला. तिने नागाला हुसकवून लावण्याचे प्रयत्न केले. दोघांमध्ये झुंज सुरू झाली. हा प्रकार कुटूंबातील लोकांना लक्षात येताच त्यांनी सर्पमित्राला बोलावून मांजर आणि नाग दोघांचे प्राण वाचवले.
पिंप्राळा परिसरातील अनंत कोळी यांच्या कुटूंबातील चार महिला जमिनीवर झोपल्या होत्या. तीन पुरूष पलंगावर झोपले होते. पहाटेच्या सुमारास भल्या मोठ्या नागाने घरात प्रवेश केला. नागाच्या फुत्कारण्याच्या आवाजाने घरातील तरुणास तीन वाजता जाग आली. पहिल्यांदा त्याने दूर्लक्ष केले परंतु फुत्कारण्याचा आवाज वाढत गेल्याने त्या दिशेने तो गेला. त्यावेळी नाग आणि घरातील पाळीव मांजरीची झुंज सुरू होती. तरुणाने घरातील इतर सदस्यांनाही जागे केले.
यावेळी तरुणाने आवाज दिल्याने जमिनीवर झोपलेल्या महिला खळबळून जागी झाल्या. नागाच्या फुत्कारण्याने मांजरही फिस्करत होती. तसेच पंजा उगारून नागाला रोखून धरत होती.
कुटूंबातील सदस्यांनी तत्काळ सर्पमित्रास बोलावले. त्यांनी नागाला सुरक्षित रित्या पकडले आणि नैसर्गिक अधिवासात सोडले. त्यानंतर कोळी कुटूंबियांनी देखील सुटकेचा निःश्वास सोडला.