Blame Game : ड्रग्ज माफिया ललित पाटील कोणाचा? आघाडीचा की युतीचा

ड्रग्ज माफिया ललित पाटीलच्या अटकेवरुन युती आणि आघाडीत आरोप-प्रत्यारोप सुरु झालेत. अटक झाली तेव्हा ललिल पाटील शिवसेनेचा नाशिक शहर प्रमुख होता, अटकेनंतर 14 दिवस चौकशी का केली नाही असा आरोप करत देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंवर निशाणा साधाला आहे. 

राजीव कासले | Updated: Oct 20, 2023, 03:13 PM IST
Blame Game : ड्रग्ज माफिया ललित पाटील कोणाचा? आघाडीचा की युतीचा title=

Drugs Mafia Lalit Patil : ड्रग्जमाफिया ललित पाटीलसंदर्भात धक्कादायक माहिती समोर आलीय. ललित पाटील (Lalit Patil) आणि त्याचा भाऊ भूषण पाटील  (Bhushan Patil) ड्रग्जच्या व्यवहारातून डोळे विस्फारतील अशी कमाई करत होते. 10 किंवा 20 लाख नाही तर महिन्याला ते 50 लाख रुपयांची कमाई करत असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. नाशिकच्या शिंदे गावात त्यांनी एमडी ड्रग्ज बनवण्याचा कारखाना सुरु केला होता अशी माहिती सूत्रांनी दिलीय. महिन्याला या कारखान्यातून 50 किलो एमडी ड्रग्ज (MD Drugs) तयार केलं जात असल्याची माहिती मिळतेय. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुण्यासह राज्यातल्या इतर शहरांमध्ये ड्रग्ज पुरवठादारांची साखळी ललित पाटीलने उभी केली. मागणी वाढल्यानंतर संशयितांनी ड्रग्ज बनविण्याचं प्रमाणही वाढवलं. ड्रग्ज तयार केल्यानंतर वितरणासाठी दोन ते तीन संशयितांवरच जबाबदारी सोपवण्यात आल्याचीही माहिती मिळतेय.

आरोप-प्रत्यारोप
ड्रग्जमाफिया ललित पाटीलवरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी थेट उद्धव ठाकरेंवरच आरोप केले आहेत. ललित पाटीलला 10 डिसेंबर 2020 रोजी अटक झाली. तेव्हा ललित पाटील उद्धव ठाकरेंच्या पक्षाचा नाशिक जिल्हाप्रमुख होता, असं म्हणत  देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय. त्यावर खासदार संजय राऊतांनी बात निकलेगी तो दूर तक जाएगी म्हणत प्रत्युत्तर दिलंय. तर या सरकारच्या काळात ललित 9 महिने ससूनमध्ये का अॅडमिट होता, असा सवाल राऊत (Sanjay Raut) यांनी तत्कालीन गृहमंत्र्यांनी केलाय.

निलम गोऱ्हे यांच्यावर आरोप
ड्रग्जच्या प्रश्नावरुन नाशिकमध्ये राजकारण तापलंय.. विद्यार्थ्यांनी मोर्चात सहभागी होऊ नये म्हणून उपसभापती नीलम गोऱ्हेंनी बैठक घेतली असा आरोप संजय राऊतांनी केलाय. त्यावरुनच उपसभापतींचा ड्रग्ज रॅकेटमध्ये सहभाग आहे का असा सवालही राऊतांनी विचारलाय.. मालेगाव, नांदगाव आणि मंत्रालयापर्यंत 10 ते 15 लाख रुपयांचे हप्ते जातात असा गंभीर आरोपही संजय राऊत यांनी केला आहे. 

ललित पाटीलच्या ड्रायव्हरला अटक
ड्रग्जमाफिया ललित पाटील प्रकरणी मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केलीय... ललित पाटीलला पळून जाण्यासाठी मदत करणाऱ्याला मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्यायत..ललित पाटील याचा ड्रायव्हर सचिन वाघ याला साकीनाका पोलिसांनी अटक केलीय.. ससून रुग्णालयातून पळताना सचिन वाघच ललित पाटील याची गाडी चालवत होता. त्यामुळे सचिन वाघकडून आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे. ललित पाटीलप्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत 16 आरोपींना अटक केलीय.

पोलीस अॅक्शनमोडमध्ये
ड्रग्जमाफिया ललित पाटीलविरोधात पुणे पोलीस आता मोठी कारवाई करणार आहे. ललित पाटील आणि त्याच्या साथीदारांविरोधात मोक्का लावण्याची तयारी पुणे पोलिसांनी सुरु केलीय. तसंच ललित पाटीलची कोठडी मिळवण्यासाठी पुणे पोलीस प्रक्रियाही सुरु करतायत. ललित पाटीलविरोधात पिंपरी चिंचवड, पुणे, मुंबई आणि नाशिक पोलिसांत संघटित ड्रग्ज रॅकेट कारवाईसंबंधी पाच गुन्हे दाखल आहेत. मोक्काच्या तरतुदींनुसार ललित पाटीलच्या अटकेसाठी हा आधार ठरू शकतो. मोक्का कायद्याअंतर्गत पोलिसांना आरोपपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत वाढवून मिळते. तोपर्यंत मोक्काअंतर्गत आरोपींना जामीन मंजूर होत नाही.