Dhangar Reservation : राज्यात सध्या मराठा, ओबीसी, मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा गाडतोय. आता त्यात भर पडलीय ती धनगर आरक्षणाच्या वादाची.. सरकारमध्ये सहभागी असणा-या अजित पवारांच्या आमदारांनीच धनगर आरक्षणाला विरोध केलाय.. धनगर समाजाला आदिवासीतूनच आरक्षण देण्याचा हट्ट का? असा सवाल नरहरी झिरवाळ यांनी केलाय.
दुसरीकडे पंढपूरमध्ये धनगर समाजाचं आठ दिवसांपासून उपोषण सुरु आहे.. मुख्यमंत्र्यांसोबत धनगर समाजाच्या शिष्टमंडळाची भेटही झाली.. कायद्याच्या चौकटीतच राहून धनगर समाजाला आरक्षण देण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलंय. तेव्हा नरहरी झिरवाळांसह आदिवासी नेत्यांनी धनगर आरक्षणाला विरोध करु नये असं आवाहन भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी केलंय.. तर धनगर आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांसोबत बसून रोड मॅप तयार केलाय. मुख्यमंत्र्यांची भूमिका सकारात्मक असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलीय..
धनगर आरक्षणावरुन मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाला अजित पवारांच्या आमदारांनीच विरोध केल्याचं दिसतंय.. मराठा-ओबीसी आरक्षणावरून मागल्या वर्षभरापासून राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघालंय.. तर आता धनगर आरक्षणाचा मुद्दाही तापताना दिसतोय.. त्यामुळे विधानसभेच्या तोंडावर आरक्षणाचा प्रश्न हा सरकारसमोरचं मोठं आव्हान असणार आहे..
दरम्यान, पंढरपुरात उपोषणस्थळी तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न केला. धनगर आरक्षण उपोषणस्थळावर हा विचित्र प्रकार घडला आहे. एका तरुणाने विषारी औषध प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यामुळे धनगर आरक्षणाचा वाद पेटला आहे. आतापर्यंत दोघांनी केला आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.