Sushma Andhare complaint against Sanjay Shirsat : शिंदे गटाचे नेते तथा शिवसेना आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare ) यांच्याशी पंगा घेणे चांगलेच महागात पडले आहे. संजय शिरसाट यांच्याविरोधात सुषमा अंधारे यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. यानंतर आता अवमानकारक वक्तव्याप्रकरणी संजय शिरसाटांविरोधातल्या अंधारेंच्या तक्रारीची महिला आयोगाने ( Women Commission) गांभिर्याने दखल घेतली आहे. यामुळे आता संजय शिरसाट यांना कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आमदार संजय शिरसाठ यांच्याविरोधात केलेल्या तक्रारीची महिला आयोगानं दखल घेतली आहे. या प्रकरणी चौकशी करुन 48 तासांत अहवाल देण्याचे निर्देश महिला आयोगाने दिले आहेत. शिरसाट यांनी अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी ही तक्रार करण्यात आली होती. पोलीस तक्रार दाखल करून घेत नसल्याचा आरोप अंधारे यांनी केला होता. याविरोधात ठाकरे गटानं संभाजीनगरमध्ये आंदोलन देखील केले होते.
सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील महिलेचा अपमान करून त्यांचे खच्चीकरण करण्याचे प्रकार वाढत असल्याचे दिसून येत आहे. कोणत्याही महिलेबाबत लोकप्रतिनिधींकडून अशा भाषेचा वापर होणे ही गंभीर बाब आहे याची दखल महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने घेतली आहे. याप्रकरणी योग्य ती चौकशी करून कार्यवाही करण्याचे निर्देश पोलीस आयुक्त छत्रपती संभाजी नगर यांना देण्यात आले आहेत. तसेच या कार्यवाहीचा चौकशी अहवाल 48 तासांत आयोग कार्यालयास पाठविण्यात यावा अशा सूचना देण्यात आल्याची माहिती महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली.
सुषमा अंधारे सगळ्यांनाच माझा भाऊ म्हणतात, पण त्या बाईने काय-काय लफडी केली आहेत, तिलाच माहिती असं वादग्रस्त वक्तव्य संजय शिरसाट यांनी केले होते. छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या शिवसेनेच्या सभेत बोलताना त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले होते. सुषमा अंधारे यांच्यासाठी ते शब्द वापरलेच नव्हतं, असं स्पष्टीकरण संजय शिरसाट यांनी दिले होते. राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील ठोंबरेनी देखील संजय शिरसाट यांच्यावर निशाणा साधला होता. गलिच्छ पद्धतीने टीका कराल तर याद राखा असा इशारच रूपाली पाटील ठोंबरे यांनी दिला होता.