How To Make Poha: 16 ऑक्टोबर रोजी वर्ल्ड फूड डे म्हणजेच राष्ट्रीय खाद्य दिवस साजरा केला जातो. महाराष्ट्रात खवय्यांची काही कमी नाही. राज्यातील प्रत्येक जिल्ह्याचा एक स्पेशल पदार्थ आहे. मुंबईचा वडापाव, पुणे-नाशिकची मिसळ तर नागपुरचे तर्री पोहे त्या त्या भागाची स्पेशालिटी आहेत. महाराष्ट्रात आधीपासूनच कांदेपोहे मोठ्या प्रमाणात केले जातात. पण महाराष्ट्राबरोबरच इंदूरमध्येही मोठ्या प्रमाणात पोहे बनवले जातात.
इंदूरला गेल्यावर एकदा तरी शेव पोहे खाल्ले पाहिजेच. कारण इंदूरचे पोहे हे नॅशनल फुड बनले आहेत. इंदूर पोह्यांसाठी जगप्रसिद्ध आहे. पण इंदूरचे पोहे आणि महाराष्ट्राचे पोहे यातील फरक काय, ते जाणून घेऊया. महाराष्ट्रात पोहे वेगवेगळ्या पद्धतीने खाल्ले जातात. साधारणपणे कांदेपोहे हा सर्वसामान्यांचा सकाळचा नाश्ता आहे. पण अनेकजण वेगवेगळ्या पद्धतीनेही पोहे खातात. यात बटाटा पोहा, दही पोहे, तर्री पोहे असेही प्रकार आहेत. पण महाराष्ट्रातील पोहो इंदूरमध्ये कसे पोहोचले हे तुम्हाला माहितीये का?
मराठा सम्राजाच्या विस्तार मध्य प्रदेशातही झाला होता. मध्य प्रदेशात दोन महाराष्ट्रीयन राज्यांनी राज्य केले. मध्य प्रदेशात होळकर आणि सिंदीया म्हणजेच शिंदे या मराठा सरदारांनी राज्य केले. सिंदीया आणि होळकर घराणे मध्य प्रदेशात पोहोचल्यावर हळूहळू पोहेदेखील इंदूर आणि मध्य प्रदेशातील इतर शहरांमध्ये पोहोचले. मध्यप्रदेशात पोहे खूपच लोकप्रिय झाले. मात्र, महाराष्ट्रापेक्षा इंदूरचे पोहे खूपच वेगळे असतात.
इंदोरमध्ये पोहे साधारण स्वातंत्र्याच्यानंतर दोन वर्षानंतर म्हणजेच 1949-50 च्या दरम्यान आले असतील. याबाबत आणखी एक अख्यायिका सांगितले जाते की, पुरुषोत्तम जोशी नावाचा एक व्यक्ती रायगड जिल्ह्यातून इंदूर येथे आला. कामाच्या शोधात जोशी आले असतानाच त्यांनी सुरुवातीला गोदरेज कंपनीत सेल्समन म्हणून काम करायला सुरुवात केली. मात्र, त्यांना स्वतःचं काही तरी करायचं होतं. तेव्हा त्यांनी उपहार गृहां सुरू केले. यापूर्वी इंदूरमध्ये एकही पोहे बनवणारे हॉटेल नव्हते.
पुरुषोत्तम जोशी यांनी बनवलेल्या पोह्याची चव इंदूरमधील लोकांना फारच आवडली आणि इंदूरमध्ये बघता बघता पोह्यांची मागणी वाढली. एका मराठी माणसानेच इंदूरमध्ये पोहे नेले. सुरुवातीला 12 ते 15 पैशांना विकले जाणारे पोहे आता एक प्लेट 20 रुपयांनी विकले जातात.