'शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दलच्या वक्तव्याचा वाद चुकीचा'

शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल केलेल्या विधानाचा चुकीचा वाद निर्माण केला जात असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे. 

Updated: Jun 25, 2017, 04:29 PM IST
'शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दलच्या वक्तव्याचा वाद चुकीचा' title=

पुणे : शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल केलेल्या विधानाचा चुकीचा वाद निर्माण केला जात असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे.

शिवाजी महाराजांचा इतिहास हा चुकीच्या पद्धतीनं शिकवला गेल्याचं विधान पवारांनी केलं होतं. ज्ञानाची मक्तेदारी ज्यांच्याकडे होती त्यांनी त्यांच्या स्वार्थासाठी सोयीचा इतिहास रंगवल्याचं वक्तव्य पवारांनी केल्यामुळे वाद निर्माण झाला होता. 'सज्जनांचं रक्षण आणि दुर्जनांचा नाश हे शिवछत्रपतींचं सूत्र होतं. छत्रपतींनी उभारलेलं राज्य भोसल्याचं नव्हे... रयतेचं राज्य होतं, असही पवार म्हणाले होते.

'कर्जमाफी शेतकऱ्यांचं समाधान करणारी नाही'

३० जून २०१७ पर्यंतची थकबाकी असलेल्या शेतक-यांना कर्जमाफी दिली जावी अशी मागणी असताना सरकारनं  ३० जून २०१६ पर्यंतची कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला असल्याचं पवार म्हणालेत.

तर दीड लाखांवरचं कर्ज भरण्यासाठी सरकारनं वन टाईम सेटलमेंट योजना शेतक-यांना पुरवण्याची मागणी शरद पवारांनी केली आहे. कर्जमाफीचा निर्णय शेतक-यांचं पूर्ण समाधान करणारा नाही, त्यामुळे कर्जमाफी संदर्भात ज्या मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत त्याची पुर्तता करण्यासाठी नव्याने प्रयत्न करण्याची गरजही त्यांनी बोलून दाखवली. त्याचवेळी नियमित कर्ज भरणा-यांसाठीची अनुदानाची रक्कम पंचवीस हजारांवरुन वाढवून किमान पन्नास हजार रुपये करण्याची मागणीही त्यांनी केली.