श्रीकांत राऊत, झी मीडिया, यवतमाळ : विदेशातून यवतमाळमध्ये परतलेल्या ‘त्या’ नऊ नागरिकांना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले आहे. जिल्हा व आरोग्य प्रशासनाने यासंदर्भातील माहिती दिली आहे.
या नागरिकांच्या पुढील उपचारासाठी थ्रोट स्वॅबचे नमुने नागपूर येथील इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयात चाचणीसाठी पाठविण्यात येणार आहे. Covid-१९ विषाणू संसर्गाच्या पार्श्वभुमीवर विदेशातील सहलीवरून यवतमाळमध्ये परतलेल्या त्या नऊ नागरिकांना खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य विभागाने त्यांच्या घरातच निरीक्षणाखाली ठेवले होते.
आता मात्र प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी तसेच त्यांचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यासाठी त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉडमध्ये ठेवण्यात आले आहे.
त्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांची माहिती गोळा करण्याचे काम सुरू असून त्याचा नियमित फॉलोअप घेण्यात येईल. आयसोलेशन कक्षात असलेल्या या नागरिकांचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहेत. त्यानंतर उपचाराची रुपरेषा ठरेल, असे जिल्हा शल्य चिकित्सक आणि अधिष्ठाता यांनी सांगितले.
राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या १२ वर गेली आहे. रुग्णांमध्ये पुण्यात ९, मुंबईत २ आणि नागपुरात १ रुग्ण असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी कोरोना संदर्भातील आजची अपडेट दिली. काल राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ११ वर होती. आज यामध्ये एका रुग्णाची भर पडली आहे.