राज्यातल्या कोरोना रुग्णांची संख्या १२ वर, आरोग्यमंत्र्यांची माहिती

 राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या १२ वर

Updated: Mar 12, 2020, 08:05 PM IST
राज्यातल्या कोरोना रुग्णांची संख्या १२ वर, आरोग्यमंत्र्यांची माहिती   title=

मुंबई : राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या १२ वर गेली आहे. रुग्णांमध्ये पुण्यात ९, मुंबईत २ आणि नागपुरात १ रुग्ण असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी कोरोना संदर्भातील आजची अपडेट दिली. काल राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ११ वर होती. आज यामध्ये एका रुग्णाची भर पडली आहे. 

कुठलाही शासकीय कार्यक्रम घ्यायचा नाही, सार्वजनिक गॅदरींग घेऊ नये अशा सुचना तहसीलदारांना देण्यात आल्या आहेत.

आमची तपासणी करा अशी जोरदार मागणी होत आहे. यामुळे लॅबवर ताण पडतोय. आवश्यक असलेल्या रुग्णांची तपासणी करण्याचे निर्देश केंद्राकडून देण्यात आले आहेत. 

पर्यटकांना परदेशात घेऊन जाऊ नये, जर जाऊन आले असतील तर त्यांची यादी आरोग्य विभागाला द्यावी. त्यांच्यात काही लक्षण आहेत का ? याची पाहणी करावी असे म्हणाले अशा सुचना टुअर ऑपरेटर्सना देण्यात आले आहेत. 

तपकिर ओढल्याने किंवा अन्य मार्गाने कोरोना जातो अशी चुकीची माहिती पसरते आहे. तहसीलदाराने दरदिवशी आपल्या जिल्ह्यात यासंदर्भात माहिती पुरवावी. जगभरात सव्वा लाखाहून अधिक लोकांना या आजाराची लागण झाल्याचेही टोपे म्हणाले. 

केंद्र शासनाच्या वतीने आलेल्या माहितीनुसार ७ अतिबाधित देशांमधून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी होणार आहे. शाळा, महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय सध्या घेण्यात आला नाही. सध्या सर्वाचे निरीक्षण सुरु असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. गरज वाटली तर दोन-तीन दिवसांत देखील शाळांसंदर्भातील निर्णय घेण्यात येऊ शकेल असेही ते म्हणाले.