चंद्रशेखर भुयार झी मीडिया, उल्हासनगर : उल्हासनगरमध्ये (Ulhas Nagar) कायदा-सुवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. दिवसा-ढवळ्या एका तरुणाची भर रस्त्यात हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. यामुळे गुंडांना पोलिसांचा धाक उरला आहे की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे.
उल्हासनगरमधल्या नेताजी चौकातील बंगलो परिसरात तलवार चॉपर घेऊन दहा ते पंधरा गुंडांनी तरुणाचा पाठलाग केला आणि त्याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला. सुशांत गायकवाड असं या तरुणाचं नाव आहे. गजबजलेल्या परिसरात अचानक ही घटना घडल्याने नागरिकांमध्येही भीतीचं वातावरण पसरलं.
हिललाईन पोलीसांनी (Hill Line Police) घटनास्थळी धाव घेत जखमी तरुणाला रुग्णालयात दाखल केलं, पण उपचारापूर्वीच तरुणाचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरु आहे.
आकाश शिंदे उर्फ चिंट्या आणि त्याच्या साथीदारांनी सुशांत गायकवाड उर्फ गुट्ट्या याची हत्या केल्याचा संशय आहे. आकाश आणि मृत सुशांत हे लहानपणापासुन चांगले मित्र होते, पण काही कारणास्तव त्यांच्यात वाद झाला. या वादातून सुशांतची हत्या केली गेल्याचं बोललं जात आहे. सुशांत गायकवाडही गुन्हेगारी पार्श्वभूमीचा होता, त्याच्यावर विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत.