राज्यातली तरूणाई धोक्यात, कुत्ता गोळीचा धिंगाणा

महाराष्ट्रातील तरुणाई धोक्यात

Updated: Nov 22, 2018, 07:28 PM IST
राज्यातली तरूणाई धोक्यात, कुत्ता गोळीचा धिंगाणा  title=

मुंबई : राज्यातली तरूणाई धोक्यात आहे. तरूणांना विळख्यात खेचण्यासाठी विविध प्रकारची प्रलोभनं आ वासून उभी आहेत. त्यात अंमली पदार्थांच्या दुनियेत रोज नवनवी ड्रग दाखल होत आहेत. त्यात सध्या कुत्ता गोळी नावाचा भयानक प्रकार धिंगाणा घालतोय. मालेगावात तर सररास कुत्ता गोळी विकली जाते आहे. या गोळीचा राज्यात झपाट्याने प्रसार होतोय. 

कुत्ता गोळीमुळे सध्या मालेगाव पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. कुत्ता गोळीचा वापर हा नशा करण्यासाठी होत आहे. गेल्या काही महिन्यांपासून कुत्ता गोळी ही अन्न आणि प्रशासन विभागासाठी आणि पोलिसांसाठी देखील डोकेदुखी ठरत आहे. औषध म्हणून वापरली जाणारी गोळी समाजकंटक नशेसाठी वापरत आहेत. या गोळीच्या सेवनाने संपूर्ण शरीर बधिर होते आणि शरीराला कोणत्याच वेदना जाणवत नाही. ही गोळी खाल्याने माणसाचं स्वत:वरचं नियंत्रण सूटतं आणि तो काहीही करु शकतो.

महाविद्यालयांपासून ते आता शाळकरी मुलांपर्यंत हे कुत्ता गोळीचं जाळं पसरत चाललं आहे. या गोष्टीची गंभीर दखल घेणं आवश्यक आहे. सुरुवातील स्वस्त भावात विकून नंतर मागणी वाढली की ही गोळी ते हव्या त्या किंमतीत विकतात. या गोळीचं एक रॅकेटच महाराष्ट्रात सुरु झालं आहे. बाजारात आज अनेक अशी औषधं आहेत ज्यांचा वापर हा नशा करण्यासाठी केला जात आहे. हळूहळू या औषधांची सवय लागते आणि त्याचं व्यसन लागतं.