राष्ट्रवादीचे आमदार अमरसिंह पंडितांवर गुन्हा

राष्ट्रवादीचे आमदार अमरसिंह पंडित यांच्यासह माजी मंत्री शिवाजीराव पंडित आणि इतर २८ लोकांवर गेवराई पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. 

Updated: Oct 30, 2017, 09:40 AM IST
राष्ट्रवादीचे आमदार अमरसिंह पंडितांवर गुन्हा title=

बीड : गेवराई तालुक्यातील गढी येथील जयभवानी सहकारी साखर कारखान्याने जिल्हा बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी करखाण्याचे विद्यमान चेअरमन राष्ट्रवादीचे आमदार अमरसिंह पंडित यांच्यासह माजी मंत्री शिवाजीराव पंडित आणि इतर २८ लोकांवर गेवराई पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. या कारवाईने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे .

राष्ट्रवादीचे आमदार अमरसिंह पंडित चेअरमन असलेल्या गढी येथील जयभवानी सहकारी साखर कारखान्याने बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून १४ कोटी रुपये कर्ज घेतले होते, या कर्जपोटी कारखान्याने बँकेला स्वतःची जमीन गहाणखत करून दिली होती, दरम्यान हीच जमीन बँकेच्या परस्पर कारखान्याने विक्री केल्याचे उघडकीस आले.
गहाणखत असलेली जमीन विक्री करून बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी बँकेचे सहायक व्यवस्थापक अश्रूबा सुर्वे यांच्या तक्रारी वरून आ पंडित यांच्यासह २८ लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मागील चार ते पाच दिवसापासून या प्रकरणात बँकेचे अधिकारी हे गेवराई पोलिसात चकरा मारत होते,अखेर रविवारी रात्री उशिरा या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.