...तरच आम्ही सरकारवर विश्वास ठेवू, मराठा क्रांती मोर्चेकऱ्यांचा अल्टिमेटम

सरकारने मेगा भरतीची प्रक्रिया तात्काळ थांबवावी. 

Updated: Jul 30, 2018, 05:54 PM IST
...तरच आम्ही सरकारवर विश्वास ठेवू, मराठा क्रांती मोर्चेकऱ्यांचा अल्टिमेटम title=

औरंगाबाद: राज्य सरकारने ११२५० जागांसाठीच्या मेगा भरतीला तात्काळ स्थगिती द्यावी. तरच मराठा समाजाच्या तरुणांना ही भरती आमच्यासाठी थांबली आहे, असा विश्वास वाटेल, अशी भूमिका सकल मराठा क्रांती मोर्चाने घेतली आहे. औरंगाबादमध्ये सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपली भूमिका सविस्तरपणे मांडली. 

 

सरकारने सर्वप्रथम मेगा भरतीला स्थगिती द्यावी. जेणेकरुन भरतीची प्रक्रिया आमच्यासाठी थांबली आहे, हा विश्वास आम्हाला वाटेल. याशिवाय, मराठा तरुणांना स्वयंरोजगार मिळवून देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाच्या कारभारावरही मराठा क्रांती मोर्चाकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. या महामंडळाची स्थापना झाली तरी त्यासाठी सरकारकडून पुरेशी आर्थिक तरतूद होत नाही. त्यामुळे आगामी काळात महामंडळासाठी मोठी आर्थिक तरतूद करावी, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी केली. 
 
 याशिवाय, मराठा समाजाच्या तरुणांना बँकातून मिळणाऱ्या कर्ज वाटपातील अडचणी प्राधान्याने दूर कराव्यात. यासाठी सरकार सर्व बँकांना कर्ज वाटपाचे लक्ष्य देणार का, त्याची अंमलबाजवणी कधी करणार, हे सरकारने स्पष्ट करावे. यासंबंधी सरकारने बँकांकडून अहवाल मागवून भूमिका स्पष्ट करावी. याशिवाय, मुख्यमंत्र्यांनी मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन दिले असले तरी तशी कृती होताना दिसत नाही, असे सांगत मराठा क्रांती मोर्चाने नाराजी व्यक्त केली.