मुंबई : जागतिक किर्तीचे न्यूरोस्पायनल सर्जन डॉ प्रेमानंद शांताराम ऊर्फ पी एस रामाणी यांच्या जीवनावर आधारित मराठी सिनेमा लवकरच आपल्या भेटीला येत आहे.
डॉ. रामाणी यांची भूमिका मराठी सिनेसृष्टीतील अभिनेता उमेश कामत साकारत आहे. कालच या सिनेमाचा मुहूर्त झाला. या अगोदर दुसऱ्या मराठी महिला डॉक्टर रखमाबाई, हेमलकसा प्रकल्पाचे प्रमुख डॉ. प्रकाश आमटे, जे. जे. रुग्णालयाचे विद्यमान डीन डॉ. तात्याराव लहाने यांच्या जीवनावर सिनेमे तयार झाले आहेत. त्यामुळे आता या सिनेमाची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे. या सिनेमाचं नाव असणार 'ताठकणा'.
डॉ. प्रेमानंद रामाणी यांनी 'ताठ कणा' या नावाने आत्मचरित्र लिहिले असून ते ग्रंथाली प्रकाशानाने २००५ मध्ये प्रसिद्ध केले आहेत. या आत्मचरित्रावर आता दिग्दर्शक दासबाबू सिनेमा तयार करत आहेत. या चित्रपटात नवोदित अभिनेत्री याशिका, अशोक सराफ, अरुण नलावडे, वर्षा उसगावकर, अलका कुबल भूमिका करणार आहेत. आणि डॉ. रामाणी यांची भूमिका अभिनेता उमेश कामत साकारत आहेत.
डॉ. रामाणी यांचा जन्म ३० नोव्हेंबर १९३८ रोजी गोव्यातील वाडी या गावात झाला. त्यांनी खडतर परिस्थितीत शिक्षण घेतले. न्यूरोस्पायनल सर्जरी या क्षेत्रामध्ये डॉ. प्रेमानंद रामाणी यांनी अतुलनीय कामगिरी केली. मुंबईच्या शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयामध्ये न्यूरोसर्जरीचा विभाग सुरू करण्याचे तसेच त्याद्वारे समाजाच्या तळागाळातील असंख्य रुग्णांना योग्य उपचार देण्याचे महत्त्वाचे काम रामाणी यांच्या हातून झाले. एक मुलगा खडतर परिस्थितीतून शिकून जागतिक कीर्तीचा न्यूरोस्पायनल सर्जन होतो. डॉ. रामाणी यांच्या आयुष्यावर बनणारा मराठी चित्रपट खडतर स्थितीत शिक्षण घेऊन आयुष्यात चांगले ध्येय गाठू शकणाऱ्या असंख्य विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, असे मत या चित्रपटाच्या निर्मात्यांनी व्यक्त केले आहे.