जीवघेण्या‘ब्ल्यू व्हेल’नंतर आता ‘डार्क नेट’चा धसका

डार्क नेट खेळणारा गोवंडीचा एक बालक घरातून बेपत्ता झाला आहे.

Updated: Nov 4, 2017, 11:57 AM IST
जीवघेण्या‘ब्ल्यू व्हेल’नंतर आता ‘डार्क नेट’चा धसका  title=

मुंबई : जीवघेण्या ब्ल्यू व्हेल गेमच्या नादाने अनेक निष्पापांचे बळी गेले. काहींनी हातावर ब्लेडने वार केले तर काहींनी टेरेस्टवरुन उडी मारली. या गेमचा जगभरात हाहाकार माजल्यानंतर अनेक देशांप्रमाणे भारतातही या खेळावर बंदी आणण्याचे निर्देश देण्यात आले. पण या खेळाचा विळखा सुटण्याआधी 'डार्क नेट' आपली काळी जादू टाकायला सुरुवात केली आहे. डार्क नेट खेळणारा गोवंडीचा एक बालक घरातून बेपत्ता झाला आहे.

गोवंडी परिसरात दहावी शिकणारा १५ वर्षाचा मुलगा बेपत्ता झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. या मुलाचे आईवडील सुशिक्षित असून मीडिया कंपनीत उच्चपदावर आहेत. २९ ऑक्टोबरला याचे पालक सिनेमा पाहण्यासाठी गेले असता हा मुलगा घर सोडून गेला. जाताना या मुलाने घरातील १५ हजार रूपयांची रक्कम सोबत नेली असून एक चिठ्ठीदेखील लिहिली आहे.    

‘मला शोधण्याचा प्रयत्न करू नका’, असे लिहिले होते. कुटुंबीय घरी परतल्यानंतर त्यांना हा सारा प्रकार लक्षात आला त्यानंतर त्यांनी सर्वत्र मुलाचा शोध घेण्यास सुरुवात झाली. जवळच्या पोलीस स्थानकात यासंबंधी तक्रार केली.

मुलाच्या जवळच्या मित्रांशी संपर्क साधल्यावर तो 'डार्क नेट' गेम खेळत असल्याचे सांगण्यात आले.  या खेळाचा तिसरा टप्पा पार करताना त्यातील आव्हानानुसार या मुलाने आपले घर सोडल्याचे समोर आले आहे.