प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीची (Vidhansabha Election 2024) रणधुमाळी सुरू झालीये. मंत्र्यांसह आमदारांनी निवडणुकीपूर्वी आपल्या मतदारसंघात विकासकामांच्या उद्घाटनाचा सपाटा लावलाय. यासाठी राज्यभरात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री दौरे करत आहेत. मात्र, कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या कार्यक्रमाला अजित पवार हे एकटेच उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अन्य मंत्र्यांनी पाठ फिरवलीये. त्यामुळे मुश्रीफांसोबत महायुतीतील नेते दुरावा करत आहेत की काय?, याची चर्चा सुरू झाली आहे.
कोल्हापूरच्या राजकारणातील वजनदार नेते
हसन मुश्रीफ यांची कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणातील (Kolhapur Politics) वजनदार नेते म्हणून ओळख आहे. राष्ट्रवादीतील बंडानंतर मुश्रीफ हे अजित पवार यांच्यासोबत गेले, आणि महायुती सरकारमध्ये मंत्री देखील झाले. मात्र, याच वजनदार नेत्यापासून महायुतीतील नेते दूर राहण्याचा प्रयत्न करत असल्याचं पाहायला मिळतंय. कोल्हापुरातील शेंडा पार्क इथं हसन मुश्रीफ यांनी 1100 बेडचं सुसज्ज हॉस्पिटल मंजूर करुन कोल्हापूरकरांना दिलासा दिला. या कामाचा शुभारंभ केंद्रीय मंत्री अमित शाहांच्या हस्ते होणार असल्याचं मुश्रीफांनी वारंवार सांगितलं.
अमित शाहांनी वेळच दिला नाही
मात्र, कोल्हापूरमधल्या या सुसज्ज हॉस्पिटलच्या पायाभरणी कार्यक्रमाला अमित शाहांनी कधी वेळच दिला नाही. त्यानंतर पायाभरणीच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री यावेत यासाठीही मुश्रीफांनी प्रयत्न केले. मात्र, ते सुद्धा निष्फळ ठरले. अखेर उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्तेच हॉस्पिटलच्या पायाभरणीचा कार्यक्रम मुश्रीफांना उरकावा लागला.
हसन मुश्रीफ हे कागलमधून निवडणूक लढविणार आहेत. तशी घोषणाही अजित पवारांनी कागलच्या सभेत केली होती. यानंतर नाराज झालेल्या समरजीत घाटगेंनी तुतारी हाती घेत मुश्रीफांविरोधात दंड थोपटलेत. तर दुसरीकडे शिवसेना नेते माजी खासदार संजय मंडलिक गटानं मेळावा घेतलाय. यामध्ये हसन मुश्रीफांनी थांबावं आणि वीरेंद्र मंडलिकांना संधी द्यावी, अशी भूमिका मांडली..
गेल्या काही दिवसांपासून कागल विधानसभा मतदारसंघात बदललेल्या राजकीय घडामोडींमुळे मुश्रीफांकडे महायुतीच्या नेत्यांकडून दुर्लक्ष केलं जात असल्याची चर्चा सुरू झालीये. महायुतीमध्ये सर्वकाही आलबेल तर नाही ना, असा प्रश्न यानिमित्तानं उपस्थित केला जातोय.