एकतर्फी प्रेमातून तरुणीची हत्या : ...तर ती वाचली असती

एकतर्फी प्रेमाचा अतिरेक, पोलिसांची असंवेदनशीलता, याचा फटका एका कुटुंबाला बसला.

Updated: Aug 4, 2018, 10:22 PM IST

कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे : ठाण्यात दिवसाढवळ्या महाविद्यालयीन तरुणीवर चाकूहल्ला करण्यात आला. यात तरुणीचा मृत्यू झालाय. एकतर्फी प्रेमातून ही हत्या झाल्याचं उघड झालंय.  ठाण्यात नवीन RTO इथे दिवसाढवळ्या महाविद्यालयीन तरुणीवर चाकूहल्ला केला गेला. यात गंभीर जखमी झालेल्या प्राचीला उपचारासाठी खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

तर वाचली असती 

या प्रकरणी पोलिसांनी आरोपी आकाश पवार याला भिवंडीतून अटक केली. गंभीर बाब म्हणजे ११ जून रोजी प्राचीनं कापूरबावडी पोलिस ठाण्यात आरोपी आकाश पवार विरोधात तक्रार दिली होती. प्राची दुसऱ्या मुला बरोबर बोलत होती. तेव्हा त्या मुला बरोबर बोलू नकोस अशी धमकी देत, आकाशने प्राचीला मारहाणही केली होती. त्याबाबतच प्राचीने पोलिसांत ती तक्रार दिली होती. त्यावेळी पोलिसांनी या प्रकरणात लक्ष घालायचं आश्वासन दिलं होतं. मात्र त्यानंतर त्यांनी काहीच पावलं उचलली नसल्यानं, आपल्या मुलीला जीव गमवावा लागल्याचा आरोप प्राचीच्या वडिलांनी केलाय.

जबाबदार कोण ?

एकतर्फी प्रेमाचा अतिरेक, पोलिसांची असंवेदनशीलता, याचा फटका एका कुटुंबाला बसला. आणि अनेक स्वप्नं बाळगून असलेल्या प्राचीनं हकनाक आपला जीव गमावला. महिलांवरचे हे अत्याचार अखेर थांबणार तरी कधी, हाच प्रश्न आहे.