पैठणीची २० लाखांची, बिलं उद्योग विभागाच्या नावावर

ही पैठणी खरेदी वादात सापडण्याचं कारण म्हणजे ही पैठणीची बिलं उद्योग विभागाच्या नावावर काढण्यात आली आहेत. 

Updated: Oct 12, 2017, 12:58 PM IST
 पैठणीची २० लाखांची, बिलं उद्योग विभागाच्या नावावर  title=

मुंबई : राज्याचे उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे यांच्या संस्थेसाठी लाखो रूपयांच्या पैठण्यांची खरेदी येवल्यातून करण्यात आली. हे करताना बिलं मात्र नाशिक एमआयडीसीच्या नावावर काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यातली काही बिलंच झी २४ तासच्या हाती लागली आहेत. मात्र उद्योग राज्यमंत्री व्यवहार पारदर्शक असल्याचा दावा करत आहेत.

हे बिल आहे येवल्यातल्या कापसे पैठणी दुकानाचं... या दुकानातून सुमारे २० लाख रूपयांच्या पैठणीची खरेदी झाल्याची चर्चा आहे. मात्र ही पैठणी खरेदी वादात सापडण्याचं कारण म्हणजे ही पैठणीची बिलं उद्योग विभागाच्या नावावर काढण्यात आली आहेत. 

ही पहा ती बिलं.. २० लाखांपैकी तब्बल ४ लाखांची बिलं उद्योग विभागाच्या नावावर काढण्यात आली आहेत. आता प्रश्न असा उपस्थित होतो की ही पैठणी खरेदी कोणासाठी केली गेली. याचं उत्तर पैठणी विक्री करणाऱ्या व्यावसायिकाने दिलं आहे. उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे यांच्या संस्थेने ही बिलं चेकने भरल्याचं या व्यावसायिकाने सांगितलं आहे. 

दुसरीकडे पैठणीबाबत झालेला खरेदी व्यवहार पारदर्शक असून त्याचे पुरावे आपल्याकडे असल्याचा दावा उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे यांनी केला आहे.

संस्थेसाठी पैठणी खरेदी झाली असेल तर मग बिल एमआयडीसीच्या नावावर का काढण्यात आलं, असा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो. तसंच राज्यमंत्र्यांच्या संस्थेसाठी खरेदी असेल, तर खरेदीसाठी कार्यकारी अभियंता का गेले होते, असाही प्रश्न समोर येत आहे. याची उत्तरं उद्योग विभागाच्या अधिकाऱ्यांनी, राज्यमंत्री प्रवीण पोटे यांनी किंवा त्यांच्या संस्थेनी देण्य़ाची गरज आहे.