मुंबई : मुंबईत वाऱ्यासह तुफान पाऊस सुरु आहे. सतत सुरु असणाऱ्या जोरदार पावसामुळे मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचलं आहे. मुसळधार पावसाचा रेल्वेवरही परिणाम झाला आहे. पावसाचं पाणी रेल्वे रुळांवर साचल्याने रेल्वे वाहतूक बंद आहे. अनेक चाकरमानी रेल्वे स्थानकांवर अडकले आहेत.
मस्जिद बंदर रेल्वे स्थानक येथे लोकलमध्ये अडकलेल्या २०० हून अधिक प्रवाशांना रेल्वे पोलिसांच्या मदतीनं सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आलं आहे. तर इतर प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफचं पथक बोलवण्यात आलं आहे. मस्जिद बंदर येथे लोकल मध्ये अडकलेल्या सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आल्याची माहिती मिळत आहे. एकूण 290 प्रवासी होते. रेल्वे आरपीएफ आणि एनडीआरएफच्या जवानांनी प्रवाशांना सुखरुप बाहेर काढलं.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी रेल्वे सेवा सुरु करण्यात आली. लॉकडाऊन काळातही काही प्रमाणात सुरु झालेल्या लोकल सेवाही या पावसामुळं ठप्प झाल्याचं पाहायला मिळालं.
पावसाचा जोर उद्याही कायम राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे नागरिकांनी सावधानता बाळगावी आणि अत्यावश्यक कारणांसाठीच घराबाहेर पडावं, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.