मुंबई: तज्ज्ञांनी इशारा दिल्यानुसार कोरोना प्रादुर्भावा शिगेला (पीक) पोहोचण्याचा कालावधी नजीक आला असतानाच मुंबईतील ICU बेडस् आणि व्हेंटिलेटर्स आत्ताच जवळपास फुल्ल असल्याची माहिती समोर आली आहे. सध्याच्या घडीला मुंबईतील ९४ टक्के व्हेंटिलेटर्स, ९९ टक्के ICU बेडस् वापरात असल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली. त्यामुळे 'पीक'च्या काळात रुग्णांची संख्या वाढल्यास नव्या रुग्णांना ठेवायचे कुठे, हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
'देशात कोरोनाचा समूह संसर्ग झालाय, केंद्र सरकारने हे सत्य स्वीकारायला पाहिजे'
११ जूनपर्यंत मुंबईत १,१८१ ICU बेडसची व्यवस्था करण्यात आली होती. यापैकी १,१६७ बेड भरलेले आहेत. तर शहरात उपलब्ध असणाऱ्या एकूण ५३० व्हेंटिलेटर्सपैकी ४९७ व्हेंटिलेटर्सही वापरात आहेत. तर ऑक्सिजनची सुविधा असलेल्या एकूण बेडसपैकी ७६ टक्के बेड आत्ताच वापरात असल्याची माहिती समोर आली आहे.
आरोग्य मंत्रालयाने कोरोनाची गंभीर लक्षणे असणाऱ्या लोकांनाच रुग्णालयात ठेवा, त्यांच्यासाठी ICU बेड किंवा व्हेंटिलेटर्सचा वापर करा, असा स्पष्ट सूचना दिल्या होत्या. मात्र, अनेक रुग्णालयांकडून या सूचनेला हरताळ फासून सरसकट रुग्णांची भरती करण्यात येत आहे. त्यामुळे आगामी काळात पालिका प्रशासनाला या नियमांची अंमलबजावणी काटेकोरपणे होईल, याकडे लक्ष द्यावे लागणार आहे.
कोरोनाची आणखी २ लक्षणं समोर, या गोष्टींकडे दुर्लक्ष करु नका
दरम्यान, समाधानाची गोष्ट हीच की, मुंबईतील रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी (डबलिंग रेट) २५ दिवसांपर्यंत वाढला आहे. तर दैनंदिन रुग्णवाढीचा दरही २.७६ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. त्यामुळे पुढील तयारीसाठी पालिकेला आणखी काही दिवस मिळाले आहेत.