आम आदमी पक्षाच्या शिष्टमंडळाने घेतली महाराष्ट्राच्या राज्यपालांची भेट

राज्यपाल कोश्यारी यांना आम आदमी पक्षाचे साकडे

Updated: Sep 27, 2020, 02:24 PM IST
आम आदमी पक्षाच्या शिष्टमंडळाने घेतली महाराष्ट्राच्या राज्यपालांची भेट

मुंबई :  सरकारच्या बहिरेपणामुळे महागड्या वीज बिलाबाबत आणि कोविड रुग्णांना महात्मा फुले योजनेतून उपचार घेण्यामध्ये येणाऱ्या अडचणींबद्दल राज्यपाल कोश्यारी यांना आम आदमी पक्षाचे साकडे. 26 सप्टेंबर 2020 रोजी आम आदमी पक्ष महाराष्ट्र शिष्टमंडळाने राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन राज्यातील महागड्या वीज बिलामुळे त्रस्त झालेल्या जनतेची गाऱ्हाणी मांडली तसेच कोविड रुग्णांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेमधून मोफत उपचार मिळण्यामध्ये येत असलेल्या अडचणी, योजनेतील भ्रष्टाचार याबद्दल निवेदन देऊन चर्चा केली.

राज्यातील कोरोना संकटकाळातील विजबिल माफीबाबत व महागड्या विजबिला संदर्भात आम आदमी पक्षाकडून गेल्या काही दिवसांत पूर्ण राज्यभरात आंदोलने करण्यात आली. सर्वच वर्गातील नागरिक कोरोना लॉकडाउन काळात आलेले वीज बिल बघून हैराण झाले आहेत. राज्य सरकारने नागरिकांना कोरोना संकट काळातील वीज बिलात सूट द्यावी म्हणून आपकडून सरकारकडे सातत्याने मागणी करण्यात येत आहे. वीजदरकपातीबाबत शिवसेनेने निवडणूक जाहीरनाम्यात आश्वासन दिले होते.

ऊर्जा मंत्र्यांनी प्रस्ताव तयार केला होता पण त्याला कचऱ्याच्या टोपलीत टाकण्यात आले.विधानसभेत भाजप व इतर विरोधी पक्षांनी जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवलाच नाही. पूर्ण महाराष्ट्रातून जनतेची निवेदने आप कार्यकर्त्यांनी जमा करून सरकारकडे पाठवली आहेत. जनतेच्या या हजारो निवेदनांना मुख्यमंत्र्यांनी काहीच प्रतिसाद दिलेला नाही. यामुळे या महाविकास आघाडीच्या बहिरेपणा विरोधात आम आदमी पार्टीने आता राज्यपालांचा दरवाजा ठोठावला आहे.

यावेळी वाढीव वीज बिलांसोबतच राज्यातील आरोग्याच्या स्थितीबद्दल राज्यपाल महोदय व आम आदमी पक्षाच्या शिष्टमंडळात सविस्तर चर्चा झाली. रुग्णांना येणाऱ्या अडचणी आम आदमी पक्षाने सविस्तर मांडल्या. राज्यातील गोरगरीब जनतेला खाजगी रुग्णालयातही मोफत आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने महात्मा फुले जन आरोग्य योजना सुरु केली; पण कोविड संकटकाळात कोविड रुग्णांना सेवा पुरविण्यात या योजनेला म्हणावे तसे यश मिळताना दिसत नाही. या योजनेतील रुग्णांना सेवा नाकारल्याच्या व पैसे भराव्या लागल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. आज राज्यातील कोविड रुग्णांचा आकडा १२ लाखा पलीकडे गेला आहे पण महात्मा फुले योजनेअंतर्गत केवळ काही हजार कोविड रुग्णांना मोफत उपचार मिळू शकले आहेत. त्यासाठी सबंधित विमा कंपनीची अरेरावी, भ्रष्टाचार, अपारदर्शकता आणि राज्य सरकारची गुपचिळी कारणीभूत आहे. आम आदमी पक्षाने खुद्द आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात या योजनेत होत असलेला भ्रष्टाचार, विमा कंपनी व हॉस्पिटल यांचे साटेलोटे पुराव्यानिशी समोर आणले आहे. कोविड संकटकाळात लोकांना मोफत आरोग्य सेवेची प्रचंड गरज असताना या योजनेची कोणतीही प्रसिद्धी विमा कंपनी यांच्या मार्फत केली जात नाही. याबाबत टीव्ही, रेडीओ, वृत्तपत्र, स्थानिक प्रसिद्धी असे प्रभावी जनजागृतीचे कोणतेच प्रयत्न केले जात नाहीत. त्यामुळे राज्यातील बहुतांशी नागरिकांना या योजनेची नेमकी माहिती मिळत नाही. राज्यातील लोकांना या योजनेची माहिती मिळू नये असे खुद्द राज्य शासनास वाटते काय? नसेल तर मग राज्य सरकार याबाबत काहीच पावले का उचलत नाही?

राज्यातील किती कोविड रुग्णांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून लाभ मिळाला याची माहिती व सध्या उपचार घेणाऱ्या कोविड रुग्णांची गोपनीयता भंग होणार नाही अशा पद्धतीने लाभार्थ्यांची  यादी राज्य सरकारने त्वरित जाहीर करावी. महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत अंगीकृत असलेल्या रुग्णालयांपैकी कोणकोणती रुग्णालये कोविड रुग्णांसाठी उपलब्ध आहेत, त्यात किती बेड, आयसीयु, व्हेंटीलेटर आहेत याची माहिती योजनेच्या  वेबसाईटवर तातडीने रिअल टाईम उपलब्ध करावी. या योजनेंतर्गत सेवा नाकारल्याच्या, पैसे उकळल्याच्या किती तक्रारी आल्या आणि त्यांचे पुढे काय झाले याबद्दल योजनेच्या वेबसाईटवर तक्रार निवारण व प्रत्येक तक्रारींची सद्यस्थिती नियमित प्रकाशित केली जावी. या योजनेंतर्गत रुग्णांना मोफत सेवा देण्यासाठी हॉस्पिटल, बेड, आयसीयु व व्हेंटीलेटर यांची संख्या वाढवावी. योजनेची प्रसिद्धी, पारदर्शकता वाढवावी. रुग्णांच्या तक्रारींचे तत्काळ निवारण करावे. समाधानकारक सेवा दिलेल्या रुग्णालयांचे थकीत पैसे योग्य ते नियम पाळून वेळेत अदा करण्यात यावेत. गैरप्रकार करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करण्यात यावी अशा मागण्यांबाबत माननीय राज्यपाल महोदयांनी राज्य शासनाला योग्य त्या सूचना द्याव्यात असे निवेदन आम आदमी पक्षाच्या वतीने देण्यात आले.
   
यावेळी आम आदमी पक्षाच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश सहसंयोजक किशोर मांदियान, महाराष्ट्र प्रदेश सचिव धनंजय शिंदे, राज्य कार्यकारणी सदस्य कुसुमाकर कौशिक आणि द्विजेंद्र तिवारी आदी उपस्थित होते.

आम आदमी पार्टीच्या मागण्याबाबत राज्यपालांनी सकारात्मक भूमिका घेत योग्य कार्यवाहीबाबत राज्य शासनाला सूचना देण्याचे आश्वासन दिले. राज्यपाल महोदयांनी अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या सरकारने वीज, आरोग्य, शिक्षण, पाणी या क्षेत्रात जनहिताच्या केलेल्या कामाचे कौतुक केले. तसेच महाराष्ट्रातील आम आदमी पक्षाच्या पुढील वाटचालीसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.