मुंबई : मुंबईतल्या आरेमध्ये 'मेट्रो ३' साठीच्या कारशेडकरता मध्यरात्रीच वृक्षतोड करण्यात आली. ही बातमी वाऱ्याच्या वेगाने पर्यावरणप्रेमींपर्यंत पोहोचल्यानंतर आरे परिसरात त्यांनी धाव घेत जोरदार घोषणाबाजी केली. मात्र तात्काळ वनराई पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. शनिवारी आरेमध्ये जाणारे तिन्ही रस्ते बंद करण्यात आलेत.
आरेमधील वृक्षतोडीला विरोध करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयानं काल फेटाळून लावली. त्यानंतर वृक्षतोडसंदर्भात प्राधिकरणानं घेतलेला निर्णयाची अंमलबजावणी, मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पोलिसांच्या सरंक्षणात सुरू केली. या परिसरात जवळपास ४०० ते ५०० पोलीस तैनात करण्यात आले आहेत. बसच्या मार्गातही बदल करण्यात आलेत. तसंच आरेच्या परिसरात १४४ कलम (जमावबंदी) लागू करण्यात आलंय.
तर उच्च न्यायालयाच्या आदेशाचा आदर करण्याचं आवाहन, मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी ट्विटद्वारे केलं आहे.
'आरेची जागा अभ्यासाअंती निश्चित केली. कमीत कमी वृक्ष तोड करून प्रकल्प करावा, असं शासनानं एमएमआरडीएला सांगितलं आणि तसा आराखडा तयार केलाय', असं वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपुरात सांगितलं तर उच्च न्यायालयाची ऑर्डर वेबसाइटवर येण्याआधीच झाडं तोडायला सुरुवात झाली हे अयोग्य आहे, असं मत शिवसेना प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केलं.