'मुख्यमंत्री ठाकरेंना हात जोडून विनंती करतो...'

 मेट्रो प्रकल्पाचा खर्च तर वाढेलच शिवाय या प्रकल्पांना प्रचंड विलंबही होणार असल्याची भीती आशिष शेलार यांनी व्यक्त केली.

Updated: Dec 2, 2019, 04:51 PM IST
'मुख्यमंत्री ठाकरेंना हात जोडून विनंती करतो...'  title=

मुंबई : आरे मेट्रो कारशेडला स्थगिती देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला. आरेतील रातोरात झालेली वृक्षतोड आणि याबद्दलच्या पर्यावरण प्रेमींच्या भावना लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला. यावर भाजप नेत्यांच्या तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. या निर्णयामुळे भविष्यात मोठा अनर्थ ओढावेल, अशी भीती माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली. भाजप नेते आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हात जोडून विनंती केली आहे. 

सरकारच्या निर्णयामुळे मेट्रो प्रकल्पाचा खर्च तर वाढेलच शिवाय या प्रकल्पांना प्रचंड विलंबही होणार असल्याची भीती आशिष शेलार यांनी व्यक्त केली. या निर्णयातून एखाद्याचा अहंकार साधला जाईल. परंतु जनहित मात्र साधले जाणार नाही. केवळ अहंकारापोटी असं करू नका, अशी आमची त्यांना हात जोडून विनंती असल्याचे शेलार म्हणाले. 

पर्यावरण रक्षणासाठीच मेट्रो आहे. खाजगी वाहतूक कमी करून सार्वजनिक वाहतूक वाढल्यानंतरच कार्बन उत्सर्जन कमी होवून पर्यावरण रक्षण होणार आहे. आरेतील कारशेड काम थांबवण्याचा निर्णय भावनाप्रधान घेण्याऐवजी व्यवहार्यतेवर घेतला पाहिजे. उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या विपरीत हे सरकार काम करत असल्याचा टोला शेलार यांनी लगावला. यामुळे रोज सव्वा चार ते साडेचार कोटी रूपयांचा तोटा होणार आहे.  तसेच प्रकल्प विलंबामुळे प्रकल्पाचा खर्चही वाढणार असून याचा भुर्दंड मुंबईकरांना वाढीव तिकीट दरांच्याद्वारे सोसावा लागेल असेही शेलार म्हणाले.

मेट्रो कारशेड प्रकल्पाला स्थगिती देण्याचा परिणाम परदेशातून राज्यात होणाऱ्या गुंतवणुकीवर होणार आहे. अर्थपुरवठा करणाऱ्या कंपन्या, देश यांच्यात वेगळा संदेश जात असल्याचे ते म्हणाले. आता तिथंली झाडं तोडली गेली आहेत, मोकळ्या जागेत कारशेडचे बांधकाम करणं सार्वजनिक हिताचे असल्याचे शेलार म्हणाले. या सर्व प्रतिक्रियांमुळे येणाऱ्या काळात आरे प्रकरण जोरात तापणार असल्याचे म्हणाले.