दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : मुंबईची आजची अवस्था पाहता मुंबई महापालिका बरखास्त करा अशी उद्विग्न मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज विधानसभेत केली. तुंबलेली मुंबई, मालाड इथे संरक्षक भिंत कोसळून झालेली दुर्घटना याप्रकरणी विधानसभेत चर्चा उपस्थित करण्यात आली होती. या चर्चेला सुरुवात करताना अजित पवारांनी मुंबई महापालिका आणि पालिकेतील सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. मालाड दुर्घटनेतील दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणीही अजित पवार यांनी विधानसभेत केली.
संपूर्ण महापालिकेची चौकशी लावा, महापौर दोषी असतील तर त्यांच्यावरही कारवाई करा. वेळ पडल्यास मुंबई महापालिकेत प्रशासक नेमा आणि मुंबई महानगरपालिका बरखास्त करा, अशी मागणी अजित पवार यांनी मुंबईकरांच्या व्यथा मांडताना केली. शिवसेनेची सत्ता महापालिकेवर असून दरवर्षी मुंबईतील कामं झाल्याचं सांगितलं जातं, मात्र परिस्थिती जैसे थे असते,पहिल्या पावसात जनजीवन विस्कळीत होते असेही अजित पवार म्हणाले.
करून दाखवलं म्हणणाऱ्यांनी मुंबई भरून दाखवली असा टोला धनंजय मुंडे यांनी शिवसेनेला लगावला आहे. पावसामुळे मुंबईच्या परिस्थितीला मुंबई महागरपालिकेतले सत्ताधारी जबाबदार आहेत असा आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला. मुंबई, पुण्यासह काही भागात पावसामुळे झालेल्या अपघातात मोठी जीवितहानी झाल्याच्या पार्श्वभूमीवर मुंडे यांनी आज स्थगन प्रस्ताव मांडला.
'मलिष्काने गाणं तयार केलं, मुंबई तुला माझ्यावर भरवसा नाही का? त्यामुळे मलिष्का नशीबवान आहे, तिला महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी घेऊन नालेसफाईच्या पाहणी दौऱ्यावर घेऊन गेले. आम्ही कित्येक वर्षे इथे ओरडतोय आमच्या सोबत एखादी बैठक घ्याव्याशी अधिकाऱ्यांना वाटली नाही', असा नाराजीचा सूर जितेंद्र आव्हाड यांनी आळवला.