पावसाने मुंबई जायबंदी, मध्य रेल्वेच्या स्टेशन्सवर शुकशुकाट

कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर शहर आणि परिसरात प्रचंड पाऊस झाल्याने, मध्य रेल्वे पाण्यामुळे जायबंदी झाली आहे. 

Updated: Aug 4, 2019, 01:12 PM IST
पावसाने मुंबई जायबंदी, मध्य रेल्वेच्या स्टेशन्सवर शुकशुकाट title=

मुंबई : कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर शहर आणि परिसरात प्रचंड पाऊस झाल्याने, मध्य रेल्वे पाण्यामुळे जायबंदी झाली आहे. शनिवारी रात्रीपासून ठाणे जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेच्या रेल्वे ट्रॅकवर पाणी भरल्याने, लोकल गाड्या थांबून आहेत.

मुंबईत मध्य रेल्वेच्या स्टेशन्सवर ना घोषणा केली जात आहे. ना कोणत्याही लोकलचं इंडिकेटर दाखवलं जात आहे. दुसरीकडे पश्चिम रेल्वेची वाहतूक मात्र सुरळीत सुरू आहे.

कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर शहरातील लोकांना आज सकाळपासूनच ज्या प्रमाणे सूर्यनारायणाचं दर्शन झालेलं नाही, त्याप्रमाणे आज लोकलगाडीचं देखील दर्शन झालं नाही.

स्टेशनवर लोकल येत नसल्याने अनेकांनी पुन्हा घरचा रस्ता गाठला आहे. यामुळे मुंबईतील मध्य रेल्वेच्या स्टेशन्सवर अभूतपूर्व शांतता दिसून येत आहे. मुंबईच्या रेल्वे स्टेशन्सवर ही आतापर्यंतची सर्वात मोठी शांतता असल्याचं सांगण्यात येत आहे.

जोपर्यंत उल्हासनगर, बदलापूरमध्ये पावसाचा प्रभाव कमी होत नाही, तोपर्यंत लोकल आणि रेल्वे गाड्यांची वाहतूक पूर्ववत होणार नसल्याचं चित्र आहे.

दुसरीकडे नाशिककडे जाण्यासाठी रेल्वे आणि रस्ते वाहतूक पूर्णपणे ठप्प असल्याने, मुंबईचा नाशिक मार्गाशी संपर्क तुटला आहे. कसारा घाटात वाहनांच्या रांगा लागल्या असल्याचं सांगण्यात येत आहे.