मुंबई: मुंबई-गोवा क्रुझ उद्घाटन सोहळ्यात धोकादायक ठिकाणी सेल्फी काढण्यावरून वाद ओढवून घेतलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पुढे येत आपली बाजू मांडली आहे. मी सेल्फी काढत होते, ती जागा सुरक्षितच होती, असा दावा अमृता यांनी केला.
मुंबई-गोवा क्रुझ पर्यटन सेवेचे शनिवारी उद्घाटन झाले. यावेळी अमृता फडणवीस यांनी क्रुझच्या अगदी टोकावर जाऊन सेल्फी काढत होत्या. यामध्ये धोका असल्यामुळे अंगरक्षक आणि एका पोलीस अधिकाऱ्याने अमृता फडणवीस यांना समजावण्याचाही प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या सूचनेकडे दुर्लक्ष करून अमृता फडणवीस यांनी सेल्फी काढण्याची हौस भागवून घेतली.
साहजिकच यावरून वाद निर्माण झाला होता. सोशल मीडियावर यावरून काही मजेशीर मिम्सही व्हायरल झाली होती. अखेर अमृता फडणवीस यांनी पुढे येत आपली बाजू मांडली. मी तिथे सेल्फीसाठी गेले नव्हते. तर ताजी हवा एन्जॉय करायला गेले होते. मी ज्या जागेवर बसले होते, ती जागा सुरक्षितच होती. माझ्यावर कारवाई केल्याने एखाद्या माणसाचं जरी भलं होत असेल, तर जरुर कारवाई करावी, असे अमृता यांनी सांगितले.
तसेच यावेळी अमृता यांनी सेल्फीसाठी जीव धोक्यात घालू नका, असा सल्लाही दिला. मीदेखील सेल्फीसाठी जीव धोक्यात घातला नव्हता. मी जिथे बसले होते, तो क्रुझच्या टोकाचा भाग नव्हता. त्याच्या खालच्या बाजूला शिडी होती. त्यामुळे मी पडले असते तरी मला दुखापत झाली नसती, असा दावाही अमृता यांनी केला.