संजय पाटील, झी मीडिया, मुंबई : राज्याच्या राजकारणाचं लक्ष हे सध्या अंधेरी पोटनिवडणुकीकडे (Andheri By Election) लागून राहिलं आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवार (Mahavikas Aghadi) ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांचा राजीनामा अजूनही मंजूर झालेला नाही. त्यामुळे लटकेंचं भवितव्य आतापर्यंत तरी अंधारात आहे. यामुळे आता ठाकरे गटाच्या 2 माजी नगरसेवकांमध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी स्पर्धा सुरु झाली आहे. (andheri by election 2022 ex corporator pramod sawant and kamlesh rai also willing for candidature if bmc not accepted rutuja latke resignation)
प्रमोद सावंत (Pramod Sawant) आणि कमलेश राय (Kamlesh Rai) हे दोघेही माजी नगरसवेक आपल्यालाच उमेदवारी मिळावी म्हणून इच्छूक आहेत. यामुळे मतदारसंघात दोन्ही माजी नगरसेवकांमध्ये गटबाजी उफाळून येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विशेष म्हणजे या दोन्ही माजी नगरसेवकांच्या पत्नी या 2017-22 या दरम्यान नगरसेविका राहिल्या आहेत.
प्रमोद सावंत यांचा गटप्रमुख-शाखाप्रमुख ते नगरसेवक असा राजकीय प्रवास राहिला आहे. प्रमोद सावंत हे 2012-2017 या कालावधीत प्रभाग क्रमांक 74 चे नगरसेवक होते. प्रमोद सावंत हे सध्या ठाकरे गटाचे अंधेरी विधानसभा संघटक आहेत. तसेच प्रमोद सावंत यांच्या पत्नी प्रियांका सावंत या 2017-22 कालावधीत नगरसेविका राहिल्या आहेत.
शिवसेनेचे पहिले उत्तर भारतीय शाखाप्रमुख अशी कमलेश राय यांची ओळख आहे. राय हे शिवसेनेचे माजी नगरसवेक राहिले आहेत. राय यांनी 2005 मध्ये शिवसेनेला 'जय महाराष्ट्र' केला होता. त्यानंतर राय यांनी संजय निरुपम यांच्यासोबत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. यानंतर ते काँग्रेसकडूनही नगरसेवक म्हणून निवडून आले. अनेक वर्ष काँग्रेसमध्ये राहिल्यानंतर अखेर राय यांनी काँग्रेसचा 'हात' सोडला. राय यांनी 6 डिसेंबर 2018 ला शिवसेनेत प्रवेश केला. राय यांच्या पत्नी याही वॉर्ड नंबर 86 च्या नगरसेविका राहिल्या आहेत.
ठाकरे गटाने ऋतुजा लटकेंचा राजीनामा स्वीकार न झाल्याने न्यायालयात धाव घेतली आहे. लटकेंच्या राजीनाम्यावर उच्च न्यायालय गुरुवारी निर्णय देणार आहे. न्यायालयाने लटकेंच्या बाजूने निकाल दिला तर ठाकरे गटासाठी हा दिलासा असेल. दिलासा नाही मिळाला, तर माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनाही उमेदवारी मिळू शकते, मात्र असं झालं तर कमलेश राय आणि प्रमोद सावंत हे दोघे काय भूमिका घेणार, याकडे अंधेरीकरांचं लक्ष असेल.