Andheri by Poll Election : अंधेरी पोटनिवडणुकीतून भाजपनं (BJP) अखेर माघार घेतलीय. मुरजी पटेल (Murji Patel) यांनी ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याचा अर्ज मागे घेतलाय. भाजपनं अंधेरी पोटनिवडणूक लढू नये, असं पत्र काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadanvis) लिहिलं होतं.
आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. सकाळी भाजपचे वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली. त्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी भाजप या निवडणुकीतून माघार घेत असल्याची घोषणा केली. भाजपनं माघार घेतल्यामुळे लटके यांच्या आमदारकीचा मार्ग मोकळा झालाय. मात्र छोटे पक्ष आणि अपक्ष म्हणून 12 उमेदवारांनी अर्ज भरलाय. या 12 जणांनी अर्ज मागे घेतला तरच निवडणूक बिनविरोध होणार आहे.
राज ठाकरे यांचं पत्र
अंधेरी पोटनिवडणुकीतून भाजपने माघार घेतल्यामुळे राज ठाकरे यांनी भाजपच्या निर्णयाचं स्वागत केलंय. राज ठाकरे यांनी पत्र लिहून आपली भूमिका स्पष्ट केलीय. चांगली, सकारात्मक राजकीय संस्कृती ही सुदृढ समाजासाठी आवश्यक असते. राजकीय पक्षांनी निकोप स्पर्धा करावी या मनसेच्या प्रयत्नांना तुम्ही प्रतिसाद दिलात ह्याबद्दल आभार असं राज यांनी म्हटलंय.
काय लिहिलंय पत्रात
श्री. देवेंद्र फडणवीस
उप-मुख्यमंत्री
महाराष्ट्र राज्य
प्रिय मित्र देवेंद्रजी,
सस्नेह जय महाराष्ट्र !
काल मी केलेल्या विनंतीला मान देऊन आपण अंधेरी (पूर्व) च्या पोट-निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा उमेदवार उभा न करण्याचा निर्णय घेतलात ह्याबद्दल आपले, आपल्या सहकाऱ्यांचे आणि पक्षातील वरिष्ठ नेतेमंडळींचे शतश: आभार.
चांगली, सकारात्मक राजकीय संस्कृती ही सुदृढ समाजासाठी आवश्यक असते. अशी राजकीय संस्कृती असावी, वाढावी आणि राजकीय मंचावर आपापले मुद्दे घेऊन राजकीय पक्षांनी निकोप स्पर्धा करावी असा प्रयत्न महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आम्ही कायम करत असतो. त्याला आज तुम्ही प्रतिसाद दिलात ह्याबद्दल तुम्हा सर्वांचे पुनःश्च आभार..
आपला मित्र,
राज ठाकरे
मुरजी पटेल समर्थक नाराज
दरम्यान, भाजपने पोटनिवडणुकीतून माघार घेतल्याने मुरजी पटेल समर्थक नाराज झालेयत...पटेलांच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केलाय.