पश्चिम रेल्वे वाहतूक पुन्हा एकदा रुळावर पण धिम्या गतीने

 सुरक्षेचा उपाय म्हणून अंधेरी दरम्यान रेल्वे धिम्या गतीने चालवण्यात येत असल्याने आजही  मुंबईकरांना मनस्ताप होण्याची शक्यता आहे.

Updated: Jul 4, 2018, 09:52 AM IST
पश्चिम रेल्वे वाहतूक पुन्हा एकदा रुळावर पण धिम्या गतीने title=

मुंबई: पश्चिम रेल्वे वाहतूक पुन्हा एकदा रुळावर आलीय. अंधेरी रेल्वे रुळावर गोखले पुलाचा काही भाग कोसळून झालेल्या अपघातानंतर मंगळवारी बांद्रा ते गोरेगाव दरम्यान वाहतूक ठप्प झाली होती. आता  रेल्वे वाहतूक पूर्ववत झालीय. जलद पाठोपाठ चर्चगेट-अंधेरी दरम्यान धिम्या मार्गावरील वाहतूकही सुरू झालीय. सुरक्षेचा उपाय म्हणून अंधेरी दरम्यान रेल्वे धिम्या गतीने चालवण्यात येत असल्याने आजही  मुंबईकरांना मनस्ताप होण्याची शक्यता आहे.

गोखले पूल पुढील काही दिवस बंद 

दरम्यान, दुरुस्तीच्या कामासाठी अंधेरी पूर्व पश्चिमेला जोडणारा गोखले पूल पुढील काही दिवस बंद राहणार आहे. त्यामुळे पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन मुंबई पोलिसांनी केलंय. वाहन चालकांनी जोगेश्वरीतील बाळासाहेब ठाकरे उड्डाण पूल , सांताक्रुज येथील मिलन सब वे उड्डाणपूल, मालाड गोरेगावसाठी मृणालताई  गोरे उड्डाणपूल, विलेपार्ले येथील कॅप्टन गोरे उड्डाणपूल आणि अंधेरी-खार-मिलन सबवे या पर्यायी मार्गांचा वापर करावा, अशी मुंबई पोलिसांनी सूचना केली आहे.

धोकादायक पुलांचा प्रश्न ऐरणीवर

अंधेरीच्या पुलाचा काही भाग ट्रॅकवर कोसळल्यावर आता मुंबईत अशा धोकादायक पुलांचा प्रश्न ऐरणीवर आलाय. मध्य रेल्वेवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दर पावसाळ्यात पारसिक बोगदा पार करताना पोटात भितीचा गोळा उठतो. आता पारसिक बोगद्यात अपघाताची रेल्वे वाट पाहात आहे का असा सवाल उपस्थित केला जातोय.