अलिबाग : अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी आणि अन्य दोन आरोपींना अलिबाग कोर्टाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी गोस्वामी यांची १४ दिवसांची कोठडी मागितली होती. पण पोलीस कोठडीची गरज नाही असं कोर्टाने म्हटलंय. न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यावर अर्णब यांचे वकील आबड पोंडा आणि गौरव पारकर यांनी तातडीने जामिनासाठी अर्ज केला. कोर्टाने या संदर्भात पोलिसांना उत्तर देण्यास सांगितलं आहे. या प्रकरणावर आज सुनावणी होणार आहे. काल रात्री तब्बल सहा तास न्यायालयात सुनावणी झाली.
अलिबाग इथे दाखल झालेली एफआयआर रद्द व्हावी अशी मागणी करणारी याचिका अर्णब गोस्वामी यांच्या वतीने हायकोर्टात दाखल करण्यात आलीय. या याचिकेवर आज दुपारी ३ वाजता हायकोर्टात सुनावणी होण्याची शक्यता आहे. काल रात्री उशिरा ही सुनावणी संपल्यामुळे अर्णब यांना कालची संपूर्ण रात्र पोलीस स्टेशनमध्येच काढावी लागली.
अर्णब गोस्वामी यांना काल सकाळीच पोलिसांनी अटक केली. त्यानंतर त्यांना अलिबाग पोलीस स्टेशनला नेण्यात आलं. पहिल्यांदा कोर्टात हजर करण्यात आलं त्यावेळी गोस्वामी यांनी पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप केला. त्यामुळे कोर्टानं त्यांची वैद्यकीय चाचणी करण्याचे निर्देश दिले.
मात्र सुनावणी सुरू असताना अर्णब यांनी आपला फोन सुरूच ठेवला. त्यामुळे न्यायालयानं त्यांना समज देत फोन बंद करण्याचे निर्देश दिले. वैद्यकीय चाचणीनंतर पोलिसांनी मारहाण केल्याचा अर्णब यांचा दावा कोर्टानं फेटाळलाय. दरम्यान अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात मुंबईतही एक गुन्हा दाखल झालाय.
अटक करताना महिला पोलीस अधिकाऱ्याला मारहाण केल्याचा आणि सरकारी कामकाजामध्ये अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय.