मुंबई : गौरव भाटकर एक मराठी नाव पुन्हा एकदा आकाशाला गवसणी घालायला सज्ज झालंय! हे सुरु झालेलं गमन आहे, एका कलावेड्या अवलियाचे. हा प्रवास आहे एका तडफदार तरुणाचा जो आपलं सरळ मार्गाने चालणारं इंटेरिअर डिझाईनचे करिअर बदलून कला क्षेत्रातील मूलभूत शिक्षण न घेता, केवळ अंत: प्रेरणेने आपल्या कुंचल्यातून एक हृदयस्पर्शी विश्व् स्थापित करतो त्याचा.
आज त्याच्या कलाविष्काराचे चाहते खूप आहेत. आवर्जून उल्लेख करायचा असेल, तर आपल्या 'द अंबानी फॅमिली'चा अनंत मुकेश अंबानी, सन्माननीय मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे, सन्मानीय श्री राज ठाकरे, मंत्री श्री आदित्य ठाकरे, अभिनेता रितेश देशमुख, सोनू सूद, सुरांचा किमयागार अदनान सामी, समाज सेविका सिंधुताई सकपाळ, क्रिकेटचा सर्वेसर्वा सचिन तेंडुलकर आणि शेहेनशाह सुनील गावस्कर आहेत. त्याचबरोबर ही यादी पुढे वाढतेय.
त्याच्या प्रभादेवीच्या ग्यालरीत बाहेरून फुटकळ दिसणाऱ्या दालनात जेव्हा तुम्ही आत प्रविष्ट होता तेव्हा एका रोमांचकारी अनुभवाला सुरवात होते. बाल सिद्धिविनायकाची त्याची सिरीज बघून तुमचे मन भरून येईल. त्याने काढलेल्या आणि एकमेव असलेल्या ब्लॅक पॅन्थरचं हुबेहुब चित्र तुमचा थरकाप उडवेल, अशी याची कला आहे.
आपल्या क्रिकेटच्या विक्रमादीत्य सुनील गावस्कर यांची स्वामी आणि साईबाबांवरची असलेली श्रद्धा सर्वश्रुत आहेच. गौरवचा गावस्कर यांच्या बरोबर भेटीचा योग जुळणार होता, मग काय आजच्या भेटीसाठी गौरवच्या कुंचल्यातून असे काही आविष्कृत झाले की, साक्षात क्रिकेटचा देवही भारावून गेला.
या पेंटिंगमध्ये बाल वयातील गावस्कर आपल्या आई (साई ) च्या कुशीत बसलेत आणि सोबत स्वामींचा आशीर्वाद! खूप कलात्मकतेने हे चित्रण एका कॅनवास वर बंदिस्त झाले आहे. जे पाहून गावस्कर यांना देखील फार आनंद झाला.
गावस्कर देखील या कलेची प्रशंसा करण्यापासून स्वत:ला थांबवू शकले नाहीत. ते म्हणाले, "हा फोटो माझ्या खूप जवळ राहिल. सकाळी उठल्यावर मला पाहाता येईल, मला दर्शन घेता येईल अशा ठिकाणी मी याला ठेवणार आहे."