आर्यन खानच्या अटकेपासून ते जामिनापर्यंत, जाणून घ्या मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात आतापर्यंत काय-काय घडलं?

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणातील इतर आरोपींना गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयातून जामीन मिळाला. 

Updated: Oct 28, 2021, 05:30 PM IST
आर्यन खानच्या अटकेपासून ते जामिनापर्यंत, जाणून घ्या मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात आतापर्यंत काय-काय घडलं?

मुंबई : अभिनेता शाहरुख खानचा (shahrukh khan son) मुलगा आर्यन खानसह (Aryan khan) मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणातील इतर आरोपींना गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयातून जामीन मिळाला. या महिन्याच्या सुरुवातीला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) मुंबई ते गोव्याला जाणाऱ्या एका क्रूझवर छापा टाकला होता. यानंतर आर्यनसह इतर लोकांना अटक करण्यात आली. मंगळवारी झालेल्या सुनावणीदरम्यान माजी अॅटर्नी जनरल आणि आर्यनचे वकील मुकुल रोहतगी यांनी युक्तिवाद केला की आर्यन खान हा तरुण असून त्याला तुरुंगात न पाठवता पुनर्वसनात पाठवले पाहिजे. 

2 ऑक्टोबर: NCB ने मुंबईहून गोव्याला जात असलेल्या कार्डेलिया क्रूझवर एका कथित ड्रग्ज पार्टीवर छापा टाकला आणि किमान 10 जणांना ताब्यात घेतले.

3 ऑक्टोबर: अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान, त्याचा मित्र अरबाज मर्चंट आणि मॉडेल मुनमुन धमेचा यांना अटक करून दुसऱ्या दिवशी म्हणजेच 4 ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडीत पाठवण्यात आले आहे.

4 ऑक्टोबर : आर्यन खानसह अन्य आरोपींना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. एनसीबीचा दावा आहे की आर्यनच्या फोनमधील फोटो आणि चॅट्स आंतरराष्ट्रीय ड्रग तस्करीकडे निर्देश करतात. न्यायालयाने त्यांना 7 ऑक्टोबरपर्यंत पुढील कोठडी सुनावली.

5 ऑक्टोबर : या प्रकरणातील आणखी चार आरोपींना अटक करण्यात आली. त्यांना 14 ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी सुनावण्यात आली.

7 ऑक्टोबर : याप्रकरणी मुंबईतील वांद्रे परिसरातून एका परदेशी नागरिकाला अटक करण्यात आली. याशिवाय न्यायालयाने आर्यन खान आणि इतर सात जणांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. आर्यन खानने जामिनासाठी अर्ज केला.

8 ऑक्टोबर : आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि अँकर-मॉडेल मुनमुन धमेचा यांनी दाखल केलेले जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला. पुढे आर्यन खान आणि इतर आरोपींना आर्थर रोड कारागृहात आणण्यात आले.

11 ऑक्टोबर: नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स (NDPS) कायद्यांतर्गत आरोपींच्या वकिलांनी मुंबईतील विशेष न्यायालयात धाव घेतली. विशेष न्यायालयाने 14 ऑक्टोबर रोजी सुनावणी घेण्याचे ठरवले. एनसीबीने मागितलेल्या एक आठवड्याच्या मुदतीला बचाव पक्षाच्या वकिलांनी विरोध केला.

13 ऑक्टोबर : मुंबई सत्र न्यायालयाने आर्यनच्या जामीन अर्जावर गुरुवारी (14 ऑक्टोबर) दुपारी 12 वाजेपर्यंत स्थगिती दिली.

14 ऑक्टोबर : मुंबई किनार्‍यावरील क्रूझ जहाजावर NCB च्या छापेमारीतील साक्षीदार किरण गोसावी यांना पुणे शहर पोलिसांनी लुकआउट नोटीस जारी केली. याशिवाय, मुंबईच्या विशेष एनडीपीएस न्यायालयाने आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांच्या जामीन अर्जावर 20 ऑक्टोबरला आपला आदेश राखून ठेवला आहे. आर्यन खानला जामीन मिळू शकला नाही आणि त्याला बुधवार, 20 ऑक्टोबरपर्यंत पुन्हा तुरुंगात पाठवण्यात आले.

20 ऑक्टोबर : एनडीपीएसच्या विशेष न्यायालयाने आर्यन खान आणि इतर आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला.

21 ऑक्टोबर : शाहरुख खानने आर्यन खानची तुरुंगात भेट घेतली. मुंबईतील विशेष नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स (एनडीपीएस) न्यायालयाने आर्यन खान आणि इतरांच्या न्यायालयीन कोठडीत 30 ऑक्टोबरपर्यंत वाढ केली आहे.

24 ऑक्टोबर : क्रुझवर छापा टाकून गोसावी यांनी एका व्यक्तीकडून 50 लाख रुपये घेतल्याचा आरोप एनसीबीने किरण गोसावी यांचे अंगरक्षक प्रभाकर रोहोजी सेलच्या साक्षीने केला. या प्रकरणात सेलही साक्षीदार आहे.

26 ऑक्टोबर : आर्यन खानच्या जामीन अर्जावरील सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारपर्यंत पुढे ढकलली.

28 ऑक्टोबर : किरण गोसावीला पुणे पोलिसांनी अटक केली. आर्यन खानच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी सुरू झाली. आर्यन आणि इतर आरोपींना जामीन मिळाला.