Sameer Wankhede Update : ही तर फक्त सुरुवात आहे... नवाब मलिक यांचा सूचक इशारा

नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत समीर वानखेडे यांच्यावर आरोपांची मालिकाच सुरु केली होती  

Updated: Nov 5, 2021, 08:39 PM IST
Sameer Wankhede Update : ही तर फक्त सुरुवात आहे... नवाब मलिक यांचा सूचक इशारा title=

मुंबई : मुंबई ड्रग्स प्रकरणात तपास करणाऱ्या समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांना मोठा धक्का बसला आहे. आर्यन खान (Aryan Khan) प्रकरणासह सहा प्रकरणांवरुन समीर वानखेडे यांना हटवण्यात आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी समीर वानखेडे यांच्यावर सातत्याने वेगवेगळे आरोप केले होते. आता समीर वानखेडे यांना हटवल्यानंतर नवाब मलिक यांनी ट्विट करत सूचक इशारा दिला आहे.

काय म्हटलं आहे नवाब मलिक यांनी

आर्यन खानसह 5 प्रकरणं समीर वानखेडे यांच्याकडून काढली, आणखी तपास व्हायला हवा, अशी 26 प्रकरणं आहेत. ही तर फक्त सुरुवात आहे, यंत्रणा सुधारण्यासाठी आणखी बरंच काही करावं लागेल, असं ट्विट नवाब मलिक यांनी केलं आहे.

नवाब मलिक यांची आरोपांची मालिका

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी एनसीबी (NCB) अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर आरोपांची मालिका सुरुच केली होती. समीर वानखेडे यांच्या जातप्रमाणपत्रावरुन, पहिल्या लग्नावरुन इतकंच काय तर समीर वानखेडे यांच्य महागड्या शर्ट-पँटवरुनही नवाब मलिक यांनी सातत्याने आरोप सुरु ठेवले होते.

महाराष्ट्राला बदनाम करण्याचं षडयंत्र

ड्रग्ज प्रकरणाच्या माध्यमातून समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्याकडून महाराष्ट्राला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले गेले आहे, असा आरोप राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केला होता. वानखेडे यांच्या मागे भाजप नेते उभे राहिलेत. महाराष्ट्राला बदनाम करणाऱ्या वानखेडे यांना निलंबित करुन जेलमध्ये टाकावे, अशी मागणी मलिक यांनी केली होती. तसेच हिवाळी अधिवेशनात मोठी नावं समोर येतील, असे मलिक यांनी यावेळी संकेत दिले होते.

समीर वानखेडे यांचं पहिलं लग्न

नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांचा निकाहनामा ट्वीटरद्वारे जारी केला होता. मलिक यांनी वानखेडेंच्या पहिल्या लग्नाचा फोटो आणि सर्टिफिकेट ट्वीट केलं करत समीर वानखेडे मुस्लीम धर्मीय असल्याचं म्हटल होतं. समीर, त्यांचे वडील, पहिली पत्नी आणि तिचे वडील सर्व मुस्लिम होते. जर समीर हिंदू असते तर निकाह झाला नसता. कारण शरियतनुसार असं होऊ शकत नाही. तसंच शरियतच्या विरोधात जाऊन काझी निकाह लावू शकत नाही, असं नवाब मलिक यांनी म्हटलं होतं.

ज्ञानदेव नाही दाऊद वानखेडे

समीर वानखेडे यांच्या जन्म दाखल्यावर वडिलांचे नाव दाऊद वानखेडे असल्याचे दर्शवणारी दाखल्याची प्रतच मलिक यांनी सादर केली होती. समीर यांचे आई-वडिल मुस्लीम होते मग त्यांनी राखीव कोट्यातून भारतीय महसूल सेवेत प्रवेश कसा मिळविला, असा सवालही मलिक यांनी केला. मलिक यांनी वानखेडे यांचा जन्माचा दाखल ट्विट केला. समीर दाऊद वानखेडे यांचा इथून सुरू झाला बोगसपणा (फर्जीवाडा) असे ट्विट त्यांनी केलं होतं. या जन्माच्या दाखल्यावर खाडाखोड केलेली दिसून येत असल्याचंही मलिक यांनी म्हटलं होतं.

ड्रग्स माफियांशी संबंध

मुंबई ड्रग्ज पार्टीत एक आंतरराष्ट्रीय माफिया त्याच्या मैत्रिणीसोबत सहभागी झाला होता. हा दाढीवाला माफिया समीर वानखेडे यांचा मित्र आहे. सीसीटीव्ही फूटेज पाहिल्यास ते सहज समोर येईल. आज तो दाढीवाला मोकाट आहे आणि काही लोकांना प्रसिद्धीसाठी विनाकारण पकडण्यात आले आहे, असा आरोप  नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केला होता. 'एनसीबीने या दाढीवाल्याला शोधून काढावे, अन्यथा आम्ही हे सार्वजनिक करु, असे आव्हान मलिक यांनी दिलं होतं.

अडीच लाखांचे शूज, 50 लाखांचं घड्याळ?

समीर वानखेडे दररोज नवनविन कपडे घालून येतात. वानखेडे तर पंतप्रधान मोदींपेक्षाही पुढे गेले आहेत, पँट 1 लाख रुपयांची, बेल्ट 2 लाख रुपयांचा, अडीच लाख रुपयांचे शूज, घड्याळ 50 लाख रुपयांचं असा आरोप नवाब मलिक यांनी केला. याचे सर्व फोटो मी तुम्हाला उपलब्ध करुन देईन, या काळात समीर वानखेडे यांनी घातलेल्या कपड्यांची किंमत जवळपास 5 ते 10 करोड रुपये असल्याचा आरोपही नवाब मलिक यांनी केला होता. एक इमानदार अधिकारी 10 कोटी रुपयांचे कपडे कसे काय घालू शकतो, असा सवालही नवाब मलिक यांनी उपस्थित केला होता. 

समीर वानखेडे दुबई आणि मालदिवमध्ये

कोरोना काळात संपूर्ण फिल्मइंडस्ट्री मालदीव आणि दुबईमध्ये असताना समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबातील लोकही तिथे होते असा आरोप करत नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांचे दुबईतील फोटो ट्विट केले आहेत. वानखेडे यांनी फिल्म स्टार्सकडून खंडणी वसूल केल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला होता.