मुंबई : पुढच्या दसरा मेळाव्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बाजूला व्यासपीठावर बसलेला असेल असा विश्वास शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. शिवतीर्थावर सुरु असलेल्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात ते बोलत आहेत. 'अबकी बार शंभर पार' अशी घोषणा यावेळी संजय राऊत यांनी शिवसैनिकांना दिली. बहुजनांचा जो पक्ष असेल तो शिवसेनाच आहे. कोणत्याही आरक्षणाशिवाय बाळासाहेबांनी मंत्री बनवले असेही ते म्हणाले. जाती पातील वाटल्या गेलेल्या महाराष्ट्राला एकसंध ठेवण्याचे काम बाळासाहेबांनी केले. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबतच एकनाथ शिंदे, भास्कर जाधव,सचिन अहिर, दिवाकर रावते, अनंत गीते, चंद्रकांत खैरे, आनंदराव अडसूळ, मिलिंद नार्वेकर उपस्थित आहेत.
शिवसेना शांत आहे. युतीत असल्यानं जपून बोलावं लागतं. आमच्या दोस्तीत स्वार्थ नाही. दोस्ती आणि नाती आम्ही पाळतो. दसरा मेळाव्याला शक्तीप्रदर्शन म्हणणं चुकीचे आहे. ५४ वर्षांपासून शिवसेना केसरी आहे तर गेल्या काही वर्षांपासून शिवसेना हिंदकेसरी असल्याचे राऊत म्हणाले. 'पुरे देश मै शोर है, महाराष्ट्र मै शिवसेना का जोर है' अशी घोषणा यावेळी त्यांनी दिली.
२०१९ च्या निर्णायक लढाईसाठी शिवसेना सज्ज असल्याचे ते म्हणाले.
लाटा येतात जातात,अशा अनेक लाटा सेनेनं पचवल्या आहेत
- बहुजनांचा खरा पक्ष हा शिवसेना आहे
- फाटक्या माणसाला आमदार, खासदार, मंत्री बनवले ते बाळासाहेबांनी
- जातीचे राजकारण हे गजकर्ण आहे, असं बाळासाहेब म्हणायचे
- मंत्रालयावर आपला भगवा फडकवायचा आहे
- लोक अपेक्षेने वाट पाहतायत आदित्य ठाकरेंची
- आमचं आदित्य नावाचं सूर्ययान २४ तारखेला मंत्रालयाच्या ६ व्या मजल्यावर उतरेल
- आठवले, जानकर यांचे वक्तव्य ऐकण्यासारखे होते, त्यांच्या डाेळ्यात अश्रू आहेत. रडत कसलं बसता अजित पवारांसारखे..
- या महाराष्ट्रात विरोधी पक्ष शिल्लक नाही
- गेल्या ५ वर्षात विरोधी पक्षाचे कामही शिवसेनेनं केलं
- काँग्रेस राष्ट्रवादीनं हे राज्य कंगाल केलं
- राज्यातील सुत्रे शिवसेनेकडे
- विनायक राऊतांवर जास्त जबाबदारी आहे, शिवसेनेच्या विजयाची सुरूवात कणकवली, कुडाळमधून होईल
- ज्यांनी आमच्यावर वार केले ते घायाळ झालेत..कोकण असेल, नवी मुंबई किंवा येवला असेल..तिच स्थिती आहे
- नोटबंदीच्या निर्ण़याविरोधात शिवेसेनेनं आवाज उठवला होता
- सध्याच्या मंदीला जबाबदार ही नोटबंदी आहे