काॅंग्रेसला 'सेक्युलरीजम' शिकवण्याची गरज नाही, शिवसेनेला चिमटा

औरंगाबादचे नामकरण करण्यावरुन शिवसेना विरुद्ध काँग्रेस 'सामना' रंगलाय

Updated: Jan 17, 2021, 06:15 PM IST

मुंबई : औरंगाबादचे नामकरण करण्यावरुन शिवसेना विरुद्ध काँग्रेस 'सामना' रंगलेला दिसून येतोय. याप्रकरणी आज सामनातून कॉंग्रेसच्या 'सेक्युलिरझम'वर टीका करण्यात आली होती. याला कॉंग्रेसकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलंय. काँग्रेसला ‘सेक्युलरीजम’ शिकवण्याची गरज नाही असा पलटवार मंत्री यशोमती ठाकूर यांनी केलाय. त्यांनी ट्विटरवरून शिवसेनेला टोला लगावलाय.

सामनातून काँग्रेसवर निशाणा साधण्यात आला होता. याला शिवसेनेचं थेट नाव न घेता यशोमती ठाकूर यांनी पलटवार केलाय. 'किमान समान कार्यक्रमावर काम करण्यास काँग्रेस कटिबद्ध असल्याचे ते म्हणाल्या. आपली मतं वैयक्तिक आहेत की पक्ष म्हणून याचा खुलासा झाल्यावर बोलता येईल असे त्या म्हणाल्या. 

औरंगजेब सेक्यूलर अजिबात नव्हता. त्याचा संबंध संभाजीराजांच्या वधाशी जोडला गेला. औरंगजेबाच्या आदेशावरुनच संभाजीराजांना हालहाल करुन मारण्यात आले आणि त्यांचा छन्नाविच्छिन्न देह बेवारस अवस्थेत फेकून देण्यात आल्याचा दाखला सामनातून देण्यात आलाय. राज्यातील सर्वच पुढाऱ्यांनी संभाजी राजांचा इतिहास पुन्हा वाचायला हवा. असा औरंगजेब कोणाला प्रिय असेल तर हे वागणं सेक्युलर नव्हे असा टोला सामनातून कॉंग्रेसला लगावण्यात आलाय.  

महाराष्ट्रातल्या राजकारण्यांनी संभाजी महाराजांवरच प्रेम करावे अशी माझी भूमिका आहे, मी काँग्रेसवर हल्ला केलेला नाही असे स्पष्टीकरण संजय राऊतांनी दिलंय. 

औरंगजेब हा क्रूर शासक होता, त्याला इतर धर्माविषयी प्रेम नव्हते, अश्या राजाच्या नावाविषयी महाराष्ट्रात काय देशात देखील कोणी आग्रही असू नये, ही शिवसेनेची भूमिका असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे संभाजी नगर हे नाव आम्ही दिले असून त्यावर आक्षेप असू नये. यात मुस्लिम किंवा हिंदू व्होट बँकेच्या प्रश्न येत नाही. याच महाराष्ट्राच्या आणि देशाच्या अस्मितेचा विषय आहे. छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याचे संस्थापक जरी असले तरी त्यांच्याइतका सेक्युलर राजा या जगात झाला नाही, तसेच छत्रपती संभाजी राजे देखील आहेत असे राऊतांनी म्हटले.