मुंबई : राज्य शासनामार्फत देण्यात येणाऱ्या नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कारासाठी ज्येष्ठ नेपथ्यकार बाबा पार्सेकर यांची निवड करण्यात आली आहे. तर संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कारासाठी ज्येष्ठ अभिनेत्री श्रीमती निर्मला गोगटे यांची निवड करण्यात आल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी केली.
५ नोव्हेंबर हा दिवस मराठी रंगभूमी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या निमित्ताने ही घोषणा करण्यात आली. ५ लाख रूपये, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे दोन्ही पुरस्कारांचे स्वरुप आहे.
सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीत सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधानसचिव नितीन गद्रे, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी, अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष जयंत सावरकर तसेच श्रीमती फैय्याज, जनार्दन लवंगारे, रवींद्र लाखे, निर्मिती सावंत, अरुण नलावडे, राजन ताम्हाणे आणि डॉ. वंदना घांगुर्डे हे सदस्य आहेत.
बाबा पार्सेकर हे मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ नेपथ्यकार आहेत. हौशी, प्रायोगिक आणि व्यावसायिक अशा रंगभूमीच्या तिन्ही धारांमध्ये बाबांनी लखलखीत कामगिरी केली आहे. जे.जे. कला महाविद्यालयातून ॲप्लाईड आर्टची पदवी घेणाऱ्या बाबा पार्सेकरांना पहिलेच गुरु भेटले ते प्रसिध्द नाट्यदिग्दर्शक दामू केंकरे. त्यांच्याबरोबर राहून बाबा भारतीय विद्या भवनाच्या एकांकिकांना नेपथ्य करु लागले.
विजया मेहता या दुसऱ्या गुरु तिथे त्यांना लाभल्या. ललितकला साधना संस्थेतून त्यांनी व्यावसायिकरंगभूमीवर नेपथ्यकार म्हणून पदार्पण केले. सुरेश खरेंच्या सागरमाझा प्राण या नाटकाचे वैशिष्टयपूर्ण नेपथ्य बाबांचे होते. आजवर ४८५ नाटकांचे नेपथ्य त्यांनी केले आहे.
निर्मला गोगटे यांचा जन्म मुंबईचा असून पं. कृष्णराव चोणकर, प्रो.बी.आर. देवधर यांचेकडून आवाज साधना शास्त्राचेविशेष मार्गदर्शन त्यांना मिळाले आहे. सुरुवातीच्या काळात महिलाकलासंगम या स्त्रियांच्या संगीत नाटकातून नायिकेच्या भूमिका त्यांनी केल्या.
साहित्य संघ मंदिर, मुंबई या संस्थेमार्फत व्यावसायिक रंगभूमीवर मा. दामले, सुरेश हळदणकर, प्रसाद सावकार, नानासाहेब फाटक, राम मराठे, रामदास कामत, छोटा गंधर्व, दाजी भाटवडेकर यांसारख्या नामवंत कलाकारांसमवेत काम करण्याची संधी त्यांना मिळाली.
व्यावसायिक रंगभूमीबरोबरच त्यांनी अनेक संस्कृत नाटकांतही भूमिका केल्या. भारतात तसेच परदेशात आकाशवाणी व दूरदर्शनवर गायनाचे कार्यक्रम त्यांनी केलेले आहेत. या दोन्ही ज्येष्ठ कलावंतांना हे पुरस्कार येत्या २० नोव्हेंबर २०१७ रोजी बोरीवली येथील प्रबोधनकार ठाकरे नाट्यमंदिर येथे समारंभपूर्वक प्रदान केले जाणार आहेत.
नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार यापूर्वी प्रभाकर पणशीकर, श्रीमती विजया मेहता, भालचंद्र पेंढारकर, प्रा. मधुकर तोरडमल, श्रीमती सुलभा देशपांडे, श्रीमती सुधा करमरकर, आत्माराम भेंडे, अरुण काकडे, श्रीकांत मोघे, रामकृष्ण नायक आणि लीलाधर कांबळी यांना प्रदान करण्यात आला आहे.
संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरवपुरस्कार यापूर्वी श्रीमती फैय्याज, प्रसाद सावकार, जयमाला शिलेदार, अरविंद पिळगावकर, रामदासकामत, कीर्ती शिलेदार, रजनी जोशी आणि चंद्रकांत उर्फ चंदू डेगवेकर यांना प्रदान करण्यात आला आहे.